होमपेज › Sangli › अजित वाडेकरांचा तो खेळ आजही स्मरणात.!

अजित वाडेकरांचा तो खेळ आजही स्मरणात.!

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 10:03PMसांगली : प्रतिनिधी 

अजित वाडेकर, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कॅप्टन. इंग्लंड आणि वेस्टइंडिजच्या विरोधातील कसोटी सामना जिंकल्यामुळे त्यांचे चांगलेच नाव झाले होते आणि त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट संघातील उत्कृष्ठ विकेटकिपर नाना जोशी यांच्या गौरवार्थ सांगलीत झालेल्या दिग्गज खेळाडूंचा सामना सांगलीकरांसाठी पर्वणीच होती. वाडेकरांच्या जोरदार फटक्यामुळे सांगलीकर मात्र तृप्त झाले होते. त्याची आठवण आजही सांगलीकरांच्या स्मरणात आहे... 

भारतीय संघाचे कप्तान म्हणून अजित वाडेकर धुरा सांभाळत होते. इंग्लंड आणि वेस्टइंडिज कसोटी सामना जिंकल्यामुळे वाडेकर यांना पाहण्यासाठी सांगलीत उत्सुकता होती. अनेक दिवस सांगलीत त्याची जाहिरातबाजी सुरू होती आणि प्रत्यक्ष सामन्यावेळी डॉ.  बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. 

सुनील गावस्कर, मन्सूर अलिखान पतौडी, चंदू बोर्डे यांच्याबरोबर भारतीय संघातील खेळाडूं सहभागी होणार होते.  सुनील गावस्कर, पतौडी यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. पोलिस बंदोबस्तात खेळाडूंचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. या सामन्यात अजित वाडेकर यांनी दमदार खेळी करून प्रेक्षकांची मने जिंकली. तब्बल 1 लाख 23 हजारांचा निधी नाना जोशी यांचा सत्कार करून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 

तत्कालीन पाटबंधारेमंत्री वसंतदादा पाटील यांच्या उपस्थितीत या सर्व क्रिकेटपटूंचा  सत्कार करण्यात आला होता.सांगलीचे तत्कालीन नगराध्यक्ष सुरेश पाटील, बापू नाडकर्णी, बॅ. शेषराव वानखेडे, माधव मंत्री, पांडुरंग साळगावकर, करसन धावरी आदी  दिग्गजही उपस्थित होते. याची आठवण सांगलीकरांच्या मनात कायमची राहून गेली. आज वाडेकर यांच्या निधनानंतर   क्रिकेटप्रेमींना या सामन्याची आणि त्यातील वाडेकर यांच्या खेळीची आवर्र्जून आठवण झाली.