Tue, Apr 23, 2019 19:50होमपेज › Sangli › गाईच्या दूध खरेदी दरात ४ रुपये कपात

गाईच्या दूध खरेदी दरात ४ रुपये कपात

Published On: Apr 27 2018 1:08AM | Last Updated: Apr 26 2018 8:37PMदेवराष्ट्रे : वार्ताहर

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गाईच्या दुधाचे दर कमी होत आहेत. मध्यंतरी दरामध्ये थोडीशी सुधारणा झाली होती. मात्र  आता  दूध खरेदी दरात प्रति लिटर 4 रुपये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा महत्वाचा जोडधंदा अडचणीत आला आहे. 

शासनाने कोणत्याही स्वरूपात दूध खरेदी दरात कपात केलेली नाही.  मात्र अनेक खासगी, सहकारी दूध संघांनी खरेदी दरात कपात सुरू केली आहे. या  दूध संघांवर शासनाचे निर्बंध असतानाही केवळ प्रशासनाच्या अनास्थेमुळे दूध व्यवसायामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. जादा दूध उत्पादन झाल्याचे सांगत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने गाईच्या दूध खरेदी दरात कपात करण्यात आली आहे. प्रत्यक्षात ग्राहकांना विकल्या जाणार्‍या दूध दरात कोणतीही कपात झालेली नाही.

कमी खर्चात जादा उत्पादन व शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून उदयास आलेल्या या व्यवसायाने  गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात चांगलेच बस्तान बसवले आहे. जोडधंद्याचे रुपांतर मुख्य व्यवसायात होऊन शेकडो बेरोजगार तरुण या क्षेत्रात काम करीत आहेत.

गेल्या दोन वषार्ंत दुधाची अतिरिक्त उपलब्धता, दूध पावडरवर असलेली निर्यातबंदी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडरीचे कमी झालेले दर यामुळे दूध संघांनी खरेदी दरात कपात केली आहे. परिणामी दूध उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. यावर दूध उत्पादक शेतकर्‍यांनी आंदोलन केले. शासनाने जुलैमध्ये खरेदी दरात वाढ केली होती. त्यानंतरही पुन्हा दर कमी केले होते. 

दोन महिन्यांपूर्वी दरात काही अंशी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे व्यवसायाला बरे  दिवस येतील, असे वाटत असतानाच खासगी व सहकारी दूध संघांनी मनमानी पध्दतीने खरेदी दर कमी करणे सुरू केले आहे. खरेदी दरात प्रति लिटर 4 रुपयांची कपात झाल्याने 3.5 फॅटला 20  आणि 4 फॅटला प्रति लिटर 21 रुपये दर मिळेल, अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

दर जैसे थे : म्हैस दूध उत्पादकांना दिलासा

गाईच्या दूध खरेदी दरात कपात झाली असली तरी म्हशीच्या दुधाचे खरेदी दर जैसे-थे आहेत.शिवाय म्हशीसाठीच्या पशुखाद्याचे (सरकी) दर कमी झाले आहेत. त्यामुळे  त्या शेतकर्‍यांना तूर्त तरी दिलासा मिळाला आहे.

Tags : sangli, sangli news, cows milk, purchase rate, 4 rupees reduction,