Wed, Apr 24, 2019 19:49होमपेज › Sangli › अमृत योजनेचा वाद मुद्द्यांवरून गुद्द्यांवर; राजदंड उचलला

अमृत योजनेचा वाद मुद्द्यांवरून गुद्द्यांवर; राजदंड उचलला

Published On: May 26 2018 12:51AM | Last Updated: May 26 2018 12:50AMअमृत योजनेसंदर्भात महासभेने आणि स्थायी समितीने जादा दराला विरोध करणारे ठराव केले होते. प्रशासनाने ते अंशत: विखंडित करण्यासाठी पाठविले आहेत. याबाबत महासभेची भूमिका शासनाला कळविण्यासाठी आजची सभा होती; परंतु सभेच्या प्रारंभीच जामदार यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. आयुक्‍तांनी गुरुवारी नगरसेवक, पदाधिकार्‍यांना बैठकीला बोलावले होते; परंतु ते स्वतःच  तेथे उपस्थित नव्हते. यावरून जामदार यांनी आगपाखड केली. ते म्हणाले, नगरसेवकांना बैठकीला बोलावून आयुक्‍त खेबुडकर हे  आमदार सुधीर गाडगीळ आणि निवडणूक अधिकार्‍यांसमवेत विश्रामधाममध्ये चर्चा करीत तास न् तास बसले होते. बैठकीचा निरोप देणारे पाणीपुरवठा अभियंता शीतल उपाध्ये यांचाही मोबाईल बंद होता. तेथून ते पुन्हा महापौरांच्या घरी गेले. आम्हाला महापालिकेत बसवून यांच्या कसल्या गप्पा चालल्या होत्या? एकीकडे प्रशासनावर आगपखड सुरू आहे आणि अमृत योजनेवरून वाद उफाळला आहे, असे  असताना या चर्चेचे कारणच काय?  माने यांची जामदार यांच्यावर टीका यानंतर पुन्हा चर्चा योजनेचा पंचनामा करण्याकडे वळली. शेखर माने अमृत योजनेबाबत प्रशासनाला जाब विचारत होते. सवाल-जवाब सुरू होते. याचदरम्यान जामदार यांचे दुसरीकडे लक्ष असल्याचे पाहून माने यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. माने म्हणाले, जामदार यांना महापालिकेचे नुकसान होते आहे, याची जाणीव नाही. उलट ठेकेदार आणि मनपाचे नुकसान करणार्‍या अधिकार्‍यांची ते पाठराखण करीत आहेत.

माने यांच्या या आरोपामुळे जामदार भडकले. ते म्हणाले, असले बेताल आरोप खपवून घेणार नाही. योजनेच्या वाढीव दराने निविदेला मीच विरोध करण्याचा ठराव केला. असे असताना बेताल वक्‍तव्ये करणार्‍यांनी शब्द मागे घ्यावेत, माफी मागावी असा त्यांनी पवित्रा घेतला.  संतप्त झालेले जामदार पिठासनासमोर गेले. महापौर शिकलगार यांनी माने यांचे आरोप कामकाजातून वगळून टाका असे आदेश दिले. परंतु माने यांनी आपला पवित्रा  कायम ठेवला. ते म्हणाले, मी शिवसेनेत आहे, जे बोललो ते पुराव्यानिशी बोलतो.

माने यांच्या या आरोपांच्या सरबत्तीमुळे जामदार  यांचा तोल सुटला. त्यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत महापौर शिकलगार यांना खडे बोल सुनावले. एवढ्यावर न थांबता त्यांनी रागाच्या भरात महापौरांच्या दिशेने माईक भिरकावला. तो माईक टेबलवर आदळून फुटला. जामदार यांनी पुन्हा पाण्याची रिकामी बाटली फेकली. नंतर पुढे जाऊन राजदंडच उचलून सभा संपविण्याचा प्रयत्न केला. अन्य सदस्यांनी मध्यस्थी करीत जामदार यांना शांत केले. जामदार यांच्या बाजूने संजय मेंढे मैदानात उतरले. त्यांनी या प्रकारानंतर महापौरांवरच आगपाखड सुरू केली. ते म्हणाले, महापौर, तुम्हीच सदस्यांत भांडणे लावायचा उद्योग करीत आहात.  माने पुन्हा आक्रमक झाले. त्यांनी  जामदार यांचे सदस्यत्व निलंबित करा अशी  मागणी केली. ते म्हणाले, यापूर्वी जनहिताच्या प्रश्‍नावरून मी राजदंड उचलला तर माझ्यावर माझ्यावर निलंबनाची कारवाई केली होती. मग जामदार यांना वेगळा न्याय का? शिकलगार यांनी मात्र तो विषयच टाळत सभा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे पुन्हा सदस्यांच्या मध्यस्थीने वादावर पडदा पडला.