Wed, Jun 26, 2019 12:05होमपेज › Sangli › साखरेचे दर पाडण्याचे षड्यंत्र : खा. शेट्टी

साखरेचे दर पाडण्याचे षड्यंत्र : खा. शेट्टी

Published On: Feb 04 2018 10:56PM | Last Updated: Feb 04 2018 10:56PMवाळवा : प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यात उसाचा पहिला हप्‍ता 2500 रुपये देण्याच्या निर्णयाबद्दल ऊस उत्पादक शेतकर्‍यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. साखरेचे दर पाडण्याचे षड्यंत्र आहे. दरम्यान, या परिस्थितीला सरकार जबाबदार असून लवकरच तीव्र आंदोलनाचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

ऊस उत्पादकांचे प्रतिनिधी म्हणून 7-8 कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक एक बैठक घेतात आणि त्यामध्ये शेतकर्‍यांना 2500 रुपयेपेक्षा जास्त प्रतिटन देता येत नसल्याचा निश्चय करून कोल्हापूरप्रमाणेच 2500 रुपये देण्याचा निर्णय घेतात. कारखानदारीमधील शेतकर्‍यांच्या उसाला दर देण्याची स्पर्धाच संपुष्टात आल्याची चर्चा शेतकर्‍यांमध्ये सुरू आहे. एका बाजूला पाणीपट्टी, वीज दरवाढ, मशागतीसाठी होणारा खर्च, खतांची दरवाढ, न परवडणारी मजुरांची मजुरी आणि शेतकर्‍यांचे कष्ट याचा विचार करता ऊस उत्पादन करणे न परवडणारे बनले आहे. लवकरच शेतकर्‍यांच्यामध्ये जनजागृती करून आंदोलन केले जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. 

चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला नाही...
खा. शेट्टी म्हणाले, साखरेचे दर पाडण्याची साखर सम्राट आणि सरकारची  चाल आहे. केंद्र व राज्य सरकारला साखरेचे दर पडू लागल्यानंतर आम्ही लक्षात आणून दिले. तरीसुद्धा त्याकडे कानाडोळा केला गेला. केंद्र सरकारने साखरेवरील निर्बंध उठविले आहेत. आजारी आणि दुबळे कारखाने साखर विकू लागले आहेत. व्यापार्‍यांनी ती मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. गरजेइतकीच साखर शिल्‍लक आहे आणि उत्पादनही मर्यादित आहे. अशी परिस्थिती असतानाही जाणीवपूर्वक साखरेचे दर ढासळले जात आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी वेळ मागूनही त्यांनी वेळ दिलेला नाही. ढासळत्या परिस्थितीला सरकार जबाबदार आहे. योग्य निर्णय न झाल्यास लवकरच साखर कारखान्याचे गळीत हंगाम मध्येच बंद पाडू.