Mon, Aug 19, 2019 17:32होमपेज › Sangli › बेदाणा सौदा पंतप्रधान उद्या ऑनलाईन पाहणार

बेदाणा सौदा पंतप्रधान उद्या ऑनलाईन पाहणार

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 16 2018 12:09AMसांगली : प्रतिनिधी

शेतीमालाला सुलभ बाजारपेठ उपलब्ध व्हावी, योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी व्यापार (ई-नाम) हा ऑनलाईन मार्केटिंग उपक्रम सुरू केला आहे.  पहिल्या टप्प्यात राज्यातील 30 बाजार समित्यांमध्ये हा उपक्रम सुरू होत आहे.  सांगली मार्केट यार्डमधील बेदाण्याचा   ई-लिलाव पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्य व केंद्राचे वरिष्ठ अधिकारी शनिवारी सकाळी 10.30 वाजता दिल्लीतून ऑनलाईन पाहणार आहेत. 

शेतीमालाला राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाने ‘ई-नाम’ हा उपक्रम सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 30 कृषी उत्पन्न बाजार समित्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले आहे. ऑनलाईन सुविधेसाठी केंद्र शासनाने बाजार समित्यांना निधीही दिलेला आहे. 

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून बेदाणा या शेतीमालाचा समावेश ‘ई-नाम’ अंतर्गत केला आहे. त्यानुसार बेदाण्याचे ‘ई-लिलाव’ होणार आहेत. मार्केट यार्डात प्रत्येक सौद्यादिवशी बेदाण्याची गेट एंट्री, आऊट एंट्री, अडत्या, व्यापारी, शेतकरी नोंदणी होईल. सौदे हॉलमध्ये मोठ्या टीव्ही स्क्रिनवर बेदाण्याचे सॅम्पल दाखविले जाईल. खरेदीदार व्यापार्‍यांनी सॅम्पल पाहून बेदाण्याचा दर मोबाईल अ‍ॅपवर नमूद करायचा आहे. जास्त दर नमूद करणार्‍या खरेदीदाराला बेदाण्याची विक्री होईल. 

पहिल्या टप्प्यात सौद्याच्या ठिकाणी उपस्थित असलेले खरेदीदार व्यापारी ‘ई-लिलाव’ मध्ये सहभागी होतील. नजिकच्या भविष्यात देशातील अन्य खरेदीदारही ऑनलाईनद्वारे सौद्यात सहभागी होतील व दरासाठी स्पर्धा वाढेल. शेतकर्‍यांना अधिक दर मिळणे शक्य होणार आहे. 

एकूणच या सर्व पार्श्‍वभूमीवर शनिवारी होणार्‍या बेदाणा ‘ई-लिलाव’कडे शेतकरी, खरेदीदार व्यापारी, अडत्यांचे लक्ष लागले आहे. सांगलीसह राज्यात 30 बाजार समित्यांमध्ये शनिवारी सकाळी 10.30 वाजता ‘ई-लिलाव’ सुरू होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी दिल्लीतून तसेच राज्य शासनाच्या कृषी पणन मंडळाचे अधिकारी हा ‘ई-लिलाव’ ऑनलाईन पाहणार आहेत. शेतकरी हित व व्यापार वृद्धीसाठी केंद्र शासनाचा ‘ई-नाम’ हा उपक्रम सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती प्रभावीपणे राबवेल.