Sun, Aug 25, 2019 08:48होमपेज › Sangli › सांगलीसह विविध ठिकाणी तुरळक पाऊस

सांगलीसह विविध ठिकाणी तुरळक पाऊस

Published On: Mar 17 2018 1:13AM | Last Updated: Mar 16 2018 11:40PMसांगली : प्रतिनिधी

सांगलीसह जिल्ह्याच्या विविध भागात आज तुरळक पाऊस झाला.  दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्याचा द्राक्ष आणि  बेदाणा या पिकांना फटका बसतो आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा  तयार झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. आज शहरात दुपारी अगदी तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला. तासगावसह तालुक्याच्या पूर्वभागात  सायंकाळी तुरळक पाऊस झाला. काहीकाळ शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. या पावसामुळे काढणीस आलेल्या द्राक्षांना तडे जाण्याचे आणि त्याची गोडी कमी होण्याचा शक्यता आहे. त्याशिवाय पाऊस आणि ढगाळ वातावरणाचे निमित्त पुढे करून व्यापारी कमी दरात द्राक्षे मागू लागले आहेत. त्याचा फटका बागायतदारांना बसत आहे. 

कवठेमहांकाळ तालुक्याच्या काही भागात दुपारी तुळक पाऊस झाला. त्या शिवाय बहुतेक भागात ढगाळ वातावरण होते. सध्या बेदाणा मोठ्या प्रमाणात शेडवर तयार करण्यात  येत आहे. या हवामानाचा बेदाणाच्या रंगात फरक होण्याची शक्यता असून गुणवत्तेवरही परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

जिल्ह्यात अनेक ठिकाणी गहू, हरभरा या रब्बी पिकाची काढणी आणि मळणी सुरू आहे. या अवकाळी वातावरणामुळे या रब्बी पिकांच्यावरही परिणाम होत आहे. पाऊस झाल्यास मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली  जात आहे. दरम्यान आणखी दोन दिवस ढगाळ वातावरण राहिल आणि तुरळक पाऊस पडेल,  असा हवामान विभागाचा अंदाज आहे.