Sun, Aug 25, 2019 07:57होमपेज › Sangli › उपनगरांमध्ये पुन्हा नरकयातना

उपनगरांमध्ये पुन्हा नरकयातना

Published On: May 13 2018 2:17AM | Last Updated: May 12 2018 8:57PMसांगली : प्रतिनिधी

दुसर्‍या दिवशीही झालेल्या पावसाने पुन्हा उपनगरांसह शहरातील जनजीवन विस्कळीत केले. यामध्ये उपनगरांतील रस्ते चिखलात रुतले असून, खुले भूखंड, रस्त्यांवर तळे साचून गटारगंगा निर्माण झाली आहे. मान्सूनपूर्व नियोजनाअभावी प्रशासन आणि पदाधिकारी-नगरसेवकांच्या निष्क्रिय कारभाराचा फटका बसला आहे. यामुळे जनतेला आता पुन्हा नरकयातनेला समोर जावे लागणार आहे.

निम्म्याहून अधिक सांगली गुंठेवारीत वसली आहे. यामध्ये सर्वाधिक मोठा भाग शामरावनगर, रामकृष्ण परमहंस सोसायटी, आप्पासाहेब पाटीलनगर ते धामणी रस्त्यावरील अनेक उपनगरांचा समावेश आहे. रामनगर, भारतनगर, रुक्मिणीनगर आदी कोल्हापूर रस्त्यावरही उपनगरे आहेत. दत्तनगर, रेपे प्लॉट, काकानगर आदी कर्नाळ रस्ता, जुना बुधगाव रस्त्यावरील उपनगरे गुंठेवारीतच आहेत. संजयनगर ते कुपवाडकडील शामनगर आदी भागही यामध्येच समाविष्ट होतो. मिरजेतही मोठ्या प्रमाणात उपनगरे आहेत. या सर्व उपनगरांमध्ये सांडपाण्याची मुख्य समस्या होती. परंतु गेल्या वर्षांत येथे सुरू असलेली ड्रेनेज योजना डोकेदुखी ठरली आहे. सांडपाणी बाहेर काढण्याऐवजी तेथील अगोदरच मुरुमी, कच्चे रस्ते खोदाईने आता चाळण झाले आहेत. त्यातील त्या रस्त्यांच्या चरीही दर्जेदारपणे मुजवलेल्या नाहीत. 

विशेषत: शामरावनगरातील दहाहून अधिक उपनगरांत अवस्था भयावह आहे. तेथील नागरिकांना मुख्य मार्गापासूनच या समस्येला कायम तोंड द्यावे लागते. विशेषत: पावसाळ्यात अक्षरश: मरणयातना भोगाव्या लागतात. यामुळे किमान घरापर्यंत ये-जा करण्याइतके रस्ते असावेत यासाठी नागरिकांनी आंदोलने केली. त्यानुसार काही भागांत रस्ते झाले. पण शामरावनगर, रामकृष्ण परमहंस सोसायटी, त्रिमूर्ती कॉलनी, अष्टविनायक कॉलनी आदी परिसर याला अपवाद ठरला आहे. तेथे चरी मुजलेल्या नाहीत. रस्त्यांच्या कामांचा पत्ताच नाही. अंतर्गत उपनगरे तर गुडघाभर चिखलात रुतली आहेत.अनेक उपनगरांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. कचरा उठावची यंत्रणा यातून पोहोचत नाही. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आता पुन्हा पावसाळ्यात नरकयातना भोगण्याची वेळ येण्याचा धोका आहे. यामुळे अवघ्या दोनच पावसात प्रशासन आणि नगरसेवकांच्या निष्क्रिय कारभाराचा पंचनामा समोर आला आहे.