Wed, Apr 24, 2019 21:46होमपेज › Sangli › राहुल-सम्राट महाडिक बंधू कोणासोबत?

राहुल-सम्राट महाडिक बंधू कोणासोबत?

Published On: Feb 25 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 10:52PMइस्लामपूर : प्रतिनिधी

तालुक्यात आगामी विधानसभेच्यादृष्टीने राष्ट्रवादीच्या विरोधात अन्य नेतेमंडळी सक्रिय होत आहेत. त्यामध्ये थेट राजकीय पक्षापेक्षा आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवणारे युवा नेते राहुल व सम्राट महाडिक हे बंधू सर्व नेत्यांपासून सुरक्षित अंतरावर आहेत. या बंधूंच्या भूमिकेकडे लक्ष आहे. 

विविध गटा-तटात तुल्यबळ राजकीय संघर्ष सुरू होईल, तेव्हा या बंधूंची भूमिका निर्णायक ठरणारी असते. आष्टा येथे झालेला नोकरी मेळावा, बागणीला कार्यकर्त्यांचा मेळावा, इस्लामपूर-पेठनाका परिसरातून युवा संघटन करणार्‍या महाडिक गटाच्या भूमिकेकडे  स्थानिक राजकीय नेत्यांचे लक्ष आहे. 

तालुक्यात नानासाहेब महाडिक गटाला मानणारा स्वतंत्र वर्ग आहे. तसे महाडिक गटाचे ऋणानुबंध काँगे्रस, भाजप, शिवसेना, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा स्वाभिमानी पक्ष, खासदार उदयनराजे भोसले तसेच कोल्हापूरकडे बंधू राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक, बंधू भाजपचे आमदार अमल महाडिक अशा मंडळींबरोबरच राज्यातील विविध पक्षांच्या नेतेमंडळींशी त्यांची उठ-बस असतेे. 

तालुक्यात मुख्यमंत्र्यांचे झालेले दौरे, ना. खोत यांच्या माध्यमातून झालेला कृषी महोत्सव, भाजपकडून नगराध्यक्ष निशिकांत पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्यात झालेले आरोप-प्रत्त्यारोप; अशा पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ सुरू आहे. मध्येच राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी खा. राजू शेट्टी यांचे केलेले स्वागत चांगलेच चर्चेत आले. 

वाळवा तालुक्यात काही गावात स्वतंत्र तर काही ठिकाणी आघाड्यांबरोबर महाडिक गट ग्रामपंचायतीत सत्तेत आला. आता ना. सदाभाऊ खोत व खा. राजू शेट्टी यांच्यातील दरी अधिक रुंदावल्याने त्याचे पडसाद तालुक्याच्या राजकारणावर उमटताना  महाडिक गट कोणासोबत राहणार, हा देखील औत्सुक्याचा विषय आहे. युवा नेते सम्राट महाडिक हेदेखील शिराळा विधानसभा मतदारसंघासाठी रिंगणात येतील, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगत असते.