Sat, Jul 20, 2019 02:31होमपेज › Sangli › सार्वजनिक स्वच्छतेवरून ठरणार जिल्ह्याचे गुणांकन

सार्वजनिक स्वच्छतेवरून ठरणार जिल्ह्याचे गुणांकन

Published On: Aug 01 2018 1:34AM | Last Updated: Jul 31 2018 11:21PMसांगली : प्रतिनिधी

देशात सर्व जिल्ह्यांचे स्वच्छताविषयक  गुणांकन ठरविण्यासाठी ‘स्वच्छ  सर्वेक्षण  ग्रामीण 2018’अंतर्गत दि. 1 ते 31 ऑगस्ट या कालावधीत  सर्वेक्षण होणार आहे. शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, मंदिरे, यात्रास्थळे तसेच ग्रामपंचायतअंतर्गत येणारी विविध सार्वजनिक ठिकाणे यांची पाहणी करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील कोणत्याही 10 ते 16 गावांना प्रत्यक्ष भेट देऊन सर्वेक्षण होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींना सर्वेक्षणासाठी सज्ज राहण्याच्या सुचना आहेत. 

गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणीची निरिक्षणे तसेच स्वच्छतेविषयी ग्रामस्थ, ग्राम पंचायत पदाधिकारी यांची स्वच्छतेबाबतीत समज आणि मते घेतली जाणार आहेत. स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाच्या संकेत स्थळावरील माहितीचा आधारही यासाठी घेण्यात येणार आहे. सर्व देशभरात हे सर्वेक्षण होणार आहे. महाराष्ट्रात 34 ग्रामीण जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व सर्व पदाधिकार्‍यांच्या हस्ते सर्वेक्षणाचा प्रारंभ होणार आहे. 

प्रत्येक जिल्ह्यातील किमान 10 ते 16 ग्रामपंचायतींची निवड सर्वेक्षणासाठी नमुना निवड पद्धतीने  सर्वेक्षण संस्थेकडून करण्यात येणार आहे. राज्यातील एकूण 340 ते 544  ग्रामपंचायतींमधून सर्वेक्षण होणार आहे. राज्यात 50 लाख ग्रामस्थांकडून प्रत्यक्ष व ऑनलाईन सहभाग घेतला जाणार आहे. गावस्तरावर सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छाग्रही, ग्रामपंचायत सदस्य, निगराणी समिती सदस्य, अंगणवाडी कार्यकर्ते, आशा आणि शिक्षक यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जाणार आहेत. गावातील 10 ग्रामस्थांकडूनही प्रतिक्रिया घेतल्या जाणार आहेत. 

699 पैकी कोणत्याही 10 ते 16 गावांची  पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत म्हणाले, सर्वेक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यातील 10 ते 16 ग्रामपंचायतींची निवड करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींची निवड केंद्र शासन करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 699 पैकी कोणत्याही 10 ते 16 गावांची पाहणी होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना सर्वेक्षणासाठी सज्ज राहण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.

स्वच्छता सर्वेक्षण... 100 गुणांचे

सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेचे निरिक्षण - 30 गुण 
(शौचालय उपलब्धता- 5 गुण, शौचालयाचा वापर- 5 गुण, 
कचर्‍याचे व्यवस्थापन- 10 गुण, सांडपाणी व्यवस्थापन- 10 गुण)
नागरिक तसेच मुख्य व्यक्तींची स्वच्छतेबाबतीत मते व अभिप्राय- 35 गुण 
(जाणीव जागृती- 20 गुण, नागरिकांचे ऑनलाईन अभिप्राय- 5 गुण, 
प्रभावी व्यक्तींचे अभिप्राय- 10 गुण). 
स्वच्छताविषयक सद्यस्थिती- 35 गुण 
(स्वच्छतेचे प्रमाण- 5 गुण, हागणदारीमुक्तीची टक्केवारी- 5 गुण,
हागणदारीमुक्त पडताळणी- 10 गुण, फोटो अपलोडींग- 5 गुण, 
नादुरुस्त शौचालय उपलब्धता- 10 गुण)
सर्वात जास्त गुण मिळविणार्‍या जिल्ह्यांना राष्ट्रीयस्तरावरून 
दि. 2 ऑक्टोबर 2018 रोजी पुरस्कार देऊन गौरविले जाणार.