Fri, May 24, 2019 20:32होमपेज › Sangli › विद्यार्थी-पालकांनो, तणावमुक्‍त रहा

विद्यार्थी-पालकांनो, तणावमुक्‍त रहा

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 13 2018 9:02PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

दै. पुढारी कस्तुरी क्‍लब आणि शुश्रुषा सल्‍ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने आयोजित केलेल्या  परीक्षेला सामोेरे जाताना...करिअर निवडताना... या कार्यक्रमाला पालक, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

येथील राजारामबापू नाट्यगृहात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील,  प्राचार्या दीपा देशपांडे, व्यावसायिक संजय बिंदगे प्रमुख उपस्थित होते. 

मानसोपचार तज्ज्ञ कालिदास पाटील म्हणाले, ताण हा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. ताण-तणावामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असून हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, त्वचा विकार असे रोग जडत आहेत. त्यासाठी मन:शांती आवश्यक आहे.परीक्षा काळात योग्य आहार घेणे महत्त्वाचे असून बेकरी उत्पादने, तळलेले पदार्थ टाळावेत. दररोज झोपेचे नियोजन लक्षात घेऊन 8 तास झोप घ्यावी. जागरण टाळावे. पालकांनीही त्यांच्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत. नकारात्मक विचार करणार्‍या लोकांपासून दूर राहिले पाहिजे. काही प्रमाणात घेतलेला ताण हा उपयुक्तच, यामुळेच माणूस क्रियाशील राहतो. 

पुणे येथील मानसोपचार तज्ज्ञ माधुरी गावडे म्हणाल्या, अतिताणाने शारीरिक, भावनिक बदल होतात. नको ते विचार येतात. तीव्र राग येतो. हातून आदळाआपट होते. यासाठी ताणावर विजय मिळवून योग्य नियोजन करता आले पाहिजे. पालकांनी कल समजून घेऊन करिअरचे मार्गदर्शन केले पाहिजे. आजूबाजूच्या विद्यार्थ्यांशी तुलना न करता अपेक्षांचे ओझे न लादू नये. 

कालिदास पाटील यांनी थेट पालक व विद्यार्थ्यांच्यात जावून संवाद साधला. कस्तुरीच्या संयोजिका मंगल देसावळे यांनी स्वागत केले. कस्तुरी कमिटी मेंबर प्रा. स्मिता पाटील यांनी प्रास्ताविकात कस्तुरी क्‍लबचा आढावा घेतला. 

कार्यक्रमात काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमधील 25 विद्यार्थ्यांची  शुश्रुषा सल्‍ला केंद्राच्यावतीने मोफत मनोमापन चाचणी करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच डॉ. अजित देवणे, डॉ. अनुजा देवणे (कोल्हापूर), मधुरा जाधव, वैशाली सगरे, संजय बिंदगे यांनी आपले अनुभव कथन केले. शुश्रुषा केंद्राच्यावतीने दै. पुढारी कस्तुरी क्‍लब प्रतिनिधी तसेच मान्यवरांचा आंतर्दीपची ट्रॉफी देवून सन्मान करण्यात आला.

कस्तुरी क्‍लबच्या कमिटी मेंबर सोनाली शिंदे, प्रा. स्मिता पाटील,  सरिता माने, प्रियांका पाटील, सुरेखा गायकवाड, वैशाली साळुंखे, राधिका चौगुले आदी महिलांनी संयोजन केले. विठ्ठल मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.