Fri, Apr 26, 2019 03:24होमपेज › Sangli › खरेदीदार व्यापार्‍याच्या दिवाणजीस मारहाण

खरेदीदार व्यापार्‍याच्या दिवाणजीस मारहाण

Published On: Apr 20 2018 1:18AM | Last Updated: Apr 19 2018 10:41PMसांगली : प्रतिनिधी

सांगली मार्केट यार्डात अडत व्यापार्‍यांचा दिवाणजी व खरेदीदार व्यापार्‍याचा दिवाणजी यांच्यात बुधवारी वादावादी झाली होती. अडत व्यापार्‍याच्या पुत्राने खरेदीदाराच्या दिवाणजीस मारहाण केली. या प्रकाराने संतप्त झालेल्या हमाल, तोलाईदार व दिवाणजींनी गुरूवारी सकाळी काम बंद ठेवून मार्केट यार्डात निषेध फेरी काढली. मगदूम-लठ्ठे अ‍ॅण्ड सन्स या अडत दुकानावर कारवाईसाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर ठिय्या मांडला. दुपारनंतर कामकाज सुरळीतपणे सुरू झाले. 

हळदीच्या सौद्यानंतर माप करण्यावरून खरेदीदार व्यापार्‍याचा दिवाणजी आणि मगदूम - लठ्ठे अ‍ॅण्ड सन्स या अडत दुकानातील दिवाणजी यांच्यात वादावादी झाली. खरेदीदाराच्या दिवाणजीने अडत्याच्या दिवाणजीकडील सौदे बुक हिसकावण्याचा प्रयत्न केला. यातून वादावादी वाढली. दरम्यान त्यानंतर अडत व्यापारी  अभय मगदूम यांच्या पुत्राने खरेदीदाराच्या दिवाणजीस मारहाण केली. हा प्रकार बुधवारी घडला होता. मात्र, त्याचे पडसाद गुरूवारी सकाळी उमटले. 

 सकाळी हमाल, तोलाईदार, दिवाणजी एकत्र आले. संबंधित अडत दुकानावर कारवाई व्हावी, अशी मागणी करीत त्यांनी काम बंद केले. मार्केट यार्डातील सर्व गल्ल्यांतून निषेध फेरी काढली. बाजार समितीकडील हमाल प्रतिनिधी संचालक बाळासाहेब बंडगर, प्रल्हाद होनमाने, आदगोंडा गौंडाजे, संभाजी काळे व हमाल, तोलाईदार, दिवाणजी या फेरीत सहभागी होते. संबंधित अडत दुकानाचा परवाना बाजार समितीने निलंबित अथवा रद्द करावा, या मागणीसाठी बाजार समिती कार्यालयासमोर ठिय्या मांडला. 

‘अडते, व्यापारी, हमाल, तोलाईदार, दिवाणजी यांची एकत्र बैठक घेऊन निर्णय दिला जाईल. हमाल, तोलाईदार, दिवाणजींनी काम बंद ठेवू नये. काम पूर्ववत सुरू करावे’, असे आवाहन बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी केले. 

अडत दुकानावर बहिष्कार

बाजार समितीचे सभापती पाटील यांच्या आवाहनानुसार गुरूवारी दुपारनंतर मार्केट यार्डातील काम पूर्ववत सुरू झाले. हमाल, तोलाईदारांनी संंबंधित अडत दुकानावर एक दिवस बहिष्कार टाकला. 

हमाल नेते बाळासाहेब बंडगर म्हणाले, अभय मगदूम यांच्या पुत्राने दिवाणजीस दुकानात आणून मारहाण केली, दम दिला. त्या दुकानात असे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे हमाल, तोलाईदारांमध्ये असंतोष आहे. मगदूम यांच्या अडत दुकानाचा परवाना निलंबित अथवा रद्द करावा. तोपर्यंत एक दिवस या अडत दुकानावर बहिष्कार राहील. 

अभय मगदूम म्हणाले, शेतीमालाची तोलाई न होताच माप देण्यासाठी  खरेदीदार व्यापार्‍याचा दिवाणजी सौदे बुक हिसकावून घेत होता. त्यातून वादावादीचा प्रकार घडला. पण हा प्रकार बुधवारी मिटला होता. गुरूवारी सकाळी तो पुन्हा कुणी तरी उकरून काढला. ते चुकीचे आहे.