होमपेज › Sangli › सांगलीत शिवप्रतिष्ठानचा निषेध मोर्चा 

सांगलीत शिवप्रतिष्ठानचा निषेध मोर्चा 

Published On: Jan 05 2018 1:25AM | Last Updated: Jan 05 2018 12:26AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

शहरातील मारुती चौकातील फलक फाडल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, बंद काळात तोडफोडीने नुकसान झालेल्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठानतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. 

भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सांगलीत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले. मारुती चौकात लावलेला फलक अज्ञातांनी दगडफेक करून फाडला. त्यानंतर तणाव निर्माण झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी शिवप्रतिष्ठानच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. 

मारुती चौकातून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. दत्त-मारुती रस्ता, हरभट रस्ता, महापालिका चौक, राजवाडा चौक मार्गे मोर्चा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. तेथे त्याचे सभेत रूपांतर झाले. मोर्चादरम्यान हुल्लडबाजांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

तेथे शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले म्हणाले, शिवप्रतिष्ठान युवकांमध्ये देश आणि धर्मप्रेम जागविण्याचे वर्षानुवर्षे काम करीत आहे. त्यामध्ये राज्यातील अठरापगड जातीचे युवक आहेत. भीमा-कोरेगाव येथील घटनेत भिडे यांचा काहीही संबंध नव्हता. तेथील घटना घडण्यापूर्वी त्यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही, सभाही घेतली नाही. तरीही सूडबुद्धीने त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीसह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. देशविघातक, जातीयवादी शक्तींनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन गुन्हे दाखल केले आहेत. 

मारूती चौकातील फलक फाडण्यामागे मोठे षडयंत्र आहे. त्याची खोलवर चौकशी करण्यात यावी. पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत जिग्नेश मेवानी, उमर खलीद, वामन मेश्राम यांनीच चिथावणीखोर भाषणे करून जाती-जातीत तेढ निर्माण केली आहे. त्यांनीच भिडेंना बदनाम करण्याचा कट रचल्याचा आरोपही चौगुले यांनी केला.

प्रकाश आंबेडकर यांच्या सांगण्यावरून एका महिलेने भिडेंच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वास्तविक वढूमध्ये झालेल्या घटनेच्यावेळी ते तेथे नव्हतेच. याचे पुरावेही संघटनेकडे आहेत. प्रशासनाकडे ते देण्यात येतील. सांगलीत तोडफोड करणार्‍या हुल्लडबाजांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणीही चौगुले यांनी यावेळी केली. 

यावेळी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या तोडफोडप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. त्यावर पर्यवेक्षण करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांची एक समिती नेमली आहे. त्यामुळे यातील दोषींवर निश्‍चीतच कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणार्‍यांची गय केली जाणार नाही. 

जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील म्हणाले, बुधवारची तणावपूर्ण परिस्थिती पोलिसांनी चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवल्या जातील. समाजविघातक कृत्ये करणार्‍यांना सोडणार नाही. कोणत्याही गोष्टीच्या आडून कायदा हातात घेतल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. गेल्या तीन दिवसांत झालेल्या तोडफोडीच्या घटनांप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येईल. 

यावेळी उपमहापौर विजय घाडगे, शेखर माने,  शिवसेनेचे नेते बजरंग पाटील, माजी नगरसेवक सुब्राव मद्रासी, अमित करमुसे, नगरसेवक शिवराज बोळाज, शशिकांत नागे, चंद्रकांत मयगुडे, मयूर घोडके, अविनाश सावंत, पृथ्वीराज पाटील, विनायक माईनकर, प्रमोद धुळूबुळू आदींसह शिवप्रतिष्ठान, शिवसेनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.