Tue, Apr 23, 2019 22:20होमपेज › Sangli › आयुक्‍तांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन

आयुक्‍तांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन

Published On: Jun 12 2018 12:53AM | Last Updated: Jun 12 2018 12:03AMसांगली : प्रतिनिधी

येथील पंचशीलनगर, रेपे प्लॉटसह अनेक उपनगरांत पावसाने दुरवस्था झाली आहे. डेंग्यू साथीचा फैलाव झाला आहे. याबद्दल तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याबद्दल संतप्त नागरिकांनी सोमवारी सायंकाळी आयुक्‍त बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन करीत निदर्शने केली. 

सामाजिक कार्यकर्ते आयुब पटेल, राष्ट्रवादीचे युवानेते सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले. आंदोलनाची दखल घेत आयुक्‍तांचे स्वीय सहाय्यक दिनेश जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी पंचशीनगरात जाऊन पंचनामा केला.

याबाबत पटेल म्हणाले,  येथील पंचशीलनगर, रेपे प्लॉट, शिंदे मळा आदी परिसरात रस्त्यांची दुरवस्था आहे. कचरा उठाव होत नाही. त्यातच सांडपाणी निचर्‍यासाठी गटारी नाहीत. त्यामुळे गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने जागोजागी पाणी साचून डासांचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. एकीकडे दलदल आणि दुसरीकडे पाणी यामुळे डेंग्यूचा फैलाव झाला आहे. पाच-सहाजणांना त्याची लागण झाली आहे. तर अनेकजण डेंग्यूसद‍ृश आजाराने हैराण आहेत. 

याबाबत आरोग्य अधिकार्‍यांना सांगूनही ऐकत नाहीत. स्वच्छता कर्मचारी नाहीत. यामुळे आज आयुक्‍त बंगल्यात दारात ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात पटेल, सूर्यवंशी, बलराम गायकवाड, अनिता औडणकर, अवधूत पवार, सचिन गायकवाड, विद्या तावरे, अनिता कांबळे, जनाबाई पाटील, कमल चोपडे, बाळू देवमारे, रमेश साळुंखे, संजय पवार, सुभान खानअली लीलाबाई गायकवाड आदी सहभागी झाले होते.

आयुक्‍त जागेवर नव्हते. त्यामुळे आंदोलनाची दखल घेत तत्काळ आयुक्‍तांचे स्वीय सहाय्यक दिनेश जाधव, डॉ. संजय कवठेकर, सहाय्यक आयुक्‍त श्री. खरात यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यांनी तत्काळ भागात जाऊन रात्रीच पंचनामा करण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. आयुक्‍तांनीही मंगळवारी पाहणीचे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे आंदोलक नरमले. परंतु दोन दिवसांत उपाययोजना झाल्या नाहीत तर आयुक्‍तांच्या बंगल्यात घुसून तेथेच संसार थाटू, असा इशारा दिला आहे.