होमपेज › Sangli › सांगली : जिवंत व्यक्तीला तिरडीवर बसवून निषेध मोर्चा

सांगली : जिवंत व्यक्तीला तिरडीवर बसवून निषेध मोर्चा

Published On: Jun 22 2018 2:57PM | Last Updated: Jun 22 2018 2:57PM



सांगली : प्रतिनिधी

तासगाव येथील अविनाश बागवडे या रुग्णास मृत ठरविल्याच्या निषेधार्थ दलित महासंघाच्यावतीने वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयावर (तिरडी) मोर्चा काढण्यात आला. या प्रकाराला डॉक्टर जबाबदार असून, त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. 

अविनाश बागवडे हे शासकीय रुग्णालयात गेल्या दहा दिवसापासून उपचार घेत आहेत. चार दिवसापूर्वी त्यांच्या शेजारील बेवारस रुग्णाचा मृत्यू झाला होता. पण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाºयांच्या अनगोंदी कारभारामुळे बागवडे यांना मृत जाहीर करण्यात आले. प्रत्यक्षात बागवडे जिवंत होते. नातेवाईकांना बेवारस रुग्णाचा मृतदेह हाती देण्यात आला होता. बागवडे मृत झाल्याचे प्रमाणपत्रही दिले होते. या प्रकारामुळे रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली गेली. याचा निषेध करण्यासाठी दलित महासंघाने मोर्चा काढला. 

मुख्य बसस्थानकावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तिरडी मोर्चास प्रारंभ झाला. झुलेलाल चौक, आंबेडकर रस्ता या मार्गावरुन हा मोर्चा रुग्णालयावर आला. पोलिसांनी रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करुन आंदोलकांना आत येण्यास अटकाव केला. तिरडीवर जिवंत व्यक्तीस बसविण्यात आले होते. त्याच्या अंगावर पांढरे कापड, गुलाल टाकून पुष्पहार अर्पण केला होता. रुग्णालय प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर व विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वनिता कांबळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. उपाध्यक्ष दिलीप शेलार, उषाताई मोहिते, संपर्क प्रमुख महेश देवकूळे, राकेश चंदनशिवे, नेताजी मस्के, सुनील वारे, अजित आवळे, अभिमन्यू वाघमारे,  विठाताई देवकूळे, राजीव खैरे, माया कांबळे, अनिल थोरात आदी मोर्चात सहभागी झाले होते. या आंदोलनाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. 

बेवारस मृतदेहाची हेळसांड केल्याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुबोध उगाणेंसह वरिष्ठ डॉक्टरांना बडतर्फ करावे, बागवडे यांच्या कुटूंबाला पाच लाखांची मदत जाहीर करावी. जिल्ह्यातील रुग्णांवर मोफत उपचार करावेत. केसपेपर शुल्क वार्षिक दहा रुपये ठेवा. रुग्णालयातील सुरक्षारक्षक यंत्रणा काढून टाकावी अशा मागण्या यावेळी करण्यात आली.

तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भागवत गेल्या दहा महिन्यापासून सेवेत नाहीत. तरीही मृत्यू प्रमाणपत्रासह अनेक कागदपत्रांवर अजूनही त्यांच्या नावाचा गैरवापर सुरु आहे. याची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.