Mon, Apr 22, 2019 23:39होमपेज › Sangli › ग्रंथदिंडीने सावरकर साहित्य संमेलनास सुरुवात

ग्रंथदिंडीने सावरकर साहित्य संमेलनास सुरुवात

Published On: Apr 21 2018 1:03AM | Last Updated: Apr 20 2018 11:54PMसांगली : प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष, लेझीम, झांजपथक आदी वाद्यांचा निनाद, पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले कार्यकर्ते अशा वातावरणात तिसाव्या सावरकर साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी सायंकाळी ग्रंथदिंडी आणि शोभायात्रा काढण्यात आली.   विश्रामबाग येथील ग्रंथदिंडीचे नेतृत्व आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले.

दरम्यान सांगलीत गावभागात आणि मिरज येथेही ग्रंथदिंडी काढण्यात आली. विश्रामबाग येथे सावरकर प्रतिष्ठानच्या क्रीडांगणात तिसाव्या सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी त्याचे उद्घाटन होत आहे.  सायंकाळी  सावरकर प्रशालेपासून ग्रंथदिंडीस प्रारंभ झाला. 

पालखीत सावरकरांची प्रतिमा व त्यांनी लिहिलेले ग्रंथ ठेवण्यात आले होते. सावरकरांच्या जीवनातील प्रसंगांचा समावेश असलेला चित्ररथ दिंडीत होता. लहान मुलांनी राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. दिंडीच्या प्रारंभी भगवा ध्वज  होता. वाहनात सावरकरांची मोठी प्रतिमा ठेवण्यात आली होती. प्रशालेतील  विद्यार्थीनींचे लेझीम व झांज पथक होते. 

सावरकरप्रेमीही भगव्या टोप्या घालून दिंडीत सहभागी झाले होते. सावरकरांचा जयघोष करीत दिंडी निघाली. संमेलनस्थळी दिंंडीचा समारोप झाला. आमदार मकरंद देशपांडे,  शेखर इनामदार, प्रकाश कुलकर्णी, विजय नामजोशी, विनायक सिंहासने, विवेक चौथाई, अ‍ॅड. बाळासाहेब देशपांडे, दीपक लेले, भारती दिगडे, मुकुंद मोहिते आदीसह अन्य कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

तीनही शहरांतील ग्रंथदिंडीचा समारोप झाल्यानंतर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विश्रामबाग येथे गीता उपासनी यांचे ‘सहा सोनेरी पानांचा इतिहास ’,  मिरजेत शंतनू रिठे यांचे ‘आज सावरकर असते तर ’  आणि सिटी हायस्कूल येथे ‘मी येसू वहिनी बोलतेय ’ या विषयावर प्रेरणा लांबे यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान उद्या (दि. 21)  केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. दोन दिवस चालणार्‍या संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी होणार आहे.

sangli, sangli news, prolegomena Dindhi Savarkar beginning of the literature meeting