Sun, May 19, 2019 22:18होमपेज › Sangli › एसटी बंदला वडापचा ‘अधिकृत’ पर्याय

एसटी बंदला वडापचा ‘अधिकृत’ पर्याय

Published On: Jun 09 2018 1:36AM | Last Updated: Jun 09 2018 1:34AMसांगली ः प्रतिनिधी

एस. टी. महामंडळाच्या संघटनांनी पुकारलेल्या अघोषित संपाच्या पार्श्‍वभूमीवर प्रवाशाचे हाल होऊ नये यासाठी प्रशासनाने वडापला अधिकृत पर्याय दिला आहे. काळी-पिवळी टॅक्सी आणि इतर टॅक्सींची बस्थानकातून व्यवस्था करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.  

दरम्यान संप काळात कोणीही कायदा हातात घेतल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांनी दिला आहे. 

एस.टी. कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली.   यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, पोलिस उपअधिक्षक (गृह) एस. एम. गिड्डे, मिरज तहसीलदार शरद पाटील, प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ए. सी. पोटे, सांगली आगार विभाग नियंत्रक ए. एस. ताम्हणकर, टॅक्सी मॅक्सी कॅप संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष उदयसिंह घोरपडे आदि उपस्थित होते.  

बैठकीत बंदच्या पार्श्‍वभूमीवर एस. टी विभाग, पोलिस विभाग आणि आरटीओ विभागाने केलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला.  संप कालावधीत नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, वाहतूक सुरळीत रहावी तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पाटील यांनी  केले. 

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले,  एस.टी.  वाहतूक संप काळात सुरळित ठेवण्यासाठी जे काही मनुष्यबळ उपलब्ध आहे, त्या आधारे प्रयत्न सुरु आहोत.  एस.टी. च्या 69 फेर्‍या सकाळपासून झाल्या आहेत. यापुढेही त्या सुरळीत चालू ठेवण्यासाठी पोलिस विभागाच्या मदतीने प्रयत्न सुरु  आहेत. कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी सर्व एस.टी . चे स्टँड व डेपो आहेत त्या ठिकाणी पोलिस संरक्षण  दिले आहे.   आरटीओ यांच्यामार्फत आज सकाळपासून काळ्या - पिवळ्या टॅक्सी व इतर टॅक्सी  यांना प्रवासी वाहतूकीची परवानगी दिली आहे. गृह विभागाने तसा आदेशही काढला आहे. 

जिल्ह्यातील  एसटीचे 3 हजार 878 कर्मचारी संपावर

सांगली जिल्ह्यात एकूण एस.टी. महामंडळाचे 4 हजार 500 कर्मचारी आहेत. यापैकी 622 कर्मचारी हजर असून 3 हजार 878 कर्मचारी संपावर अहेत. हजर कर्मचार्‍यांची टक्केवारी 13 टक्के इतकी आहे. आवश्यक त्या मनुष्यबळानुसार वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे   सांगली आगार विभाग नियंत्रक ए. एस. ताम्हणकर यांनी सांगितले.