Tue, May 21, 2019 00:47होमपेज › Sangli › सोलर पंप किंमत तफावतीत गौडबंगाल!

सोलर पंप किंमत तफावतीत गौडबंगाल!

Published On: Dec 13 2017 1:59AM | Last Updated: Dec 12 2017 9:57PM

बुकमार्क करा

सांगली : उध्दव पाटील

अटल सौर कृषी योजनेतील सोलर सबमर्सिबल पंपाची किंमत बाजारभावापेक्षा लाख ते दोन लाख रुपये जादा आहे. स्थानिक बाजारातील पंप हे केंद्र शासनाच्या अपारंपारिक ऊर्जा मंत्रालयाच्या स्टँडर्ड स्पेशिफिकेशननुसारचे आहेत. तरिही दरातील मोठ्या तफावतीमुळे प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. सोलर सबमर्सिबल पंप किंमतीत गौडबंगाल असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. 

राज्य शासनाने अटल सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. विहीर किंवा बोअरवेलसाठी सोलर सबमर्सिबल पंप बसविता योणार आहे. या पंपाच्या क्षमतेनुसार 3.24 लाख रुपये ते 7.20 लाख रुपये  पंपाची किंमत आहे. या किंमतीतील 30 टक्के रक्कम केंद्र शासन, 5 टक्के महाराष्ट्र शासन अनुदान मिळणार आहे. लाभार्थी शेतकर्‍याचा हिस्सा 5 ते 15 टक्के आहे. पाच एकरापर्यंतच्या शेतकर्‍याला लाभार्थी हिस्सा 5 टक्के तर 5 ते 10 एकर क्षेत्र असलेल्या शेतकर्‍याला लाभार्थी हिस्सा 15 टक्के आहे. उर्वरित 50 ते 60 टक्के रक्कम बँकेकडून लाभार्थींच्या नावे कर्ज घेऊन उपलब्ध केली जाणार आहे. या कर्जाची परतफेड महावितरण करणार आहे. सांगली जिल्ह्याला 210 लाभार्थी शेतकर्‍यांचे उद्दीष्ट आहे.  

अटल सौर कृषी पंप योजनेतील सोलर सबमर्सिबल पंपाची किंमत निश्‍चित केलेली आहे. देखभाल, दुरुस्तीची वॉरंटी आहे. दुरुस्तीचा प्रश्‍न उद्भवल्यास संबंधित एजन्सीचे प्रतिनिधी शेतात जाऊन दुरूस्ती करून देणार आहेत. दरम्यान, बाजारातील सोलर सबमर्सिबल पंपांची किंमत मात्र  योजनेतील पंपापेक्षा तब्बल लाख ते दोन लाख रुपयांनी कमी आहे. बाजारातील पंपालाही वॉरंटी/गॅरंटी आहे. तरिही किंमतीतील मोठ्या तफावतीने अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. बाजारातील सोलर सबमर्सिबल पंप हे केंद्र शासनाच्या अपारंपारिक ऊर्जा मंत्रालयाच्या स्टँडर्ड स्पेसिफिकेशननुसार आहेत. तरिही दोन्ही पंपाच्या किंमतीतील फरकामागे गौडबंगाल काय, असा प्रश्‍न आहे. 

सौर कृषी पंप योजनेत पंपाच्या किंमतीच्या 5 ते 15 टक्के हिस्सा शेतकर्‍याला भरावा लागणार आहे. पंपाची किंमत बाजारभावापेक्षा लाख ते दोन लाख रुपये जादा असल्याने लाभार्थी शेतकर्‍याच्या हिश्याची रक्कमही वाढली आहे. जादा किंमतीचा शेतकर्‍यांवर भूर्दंड आणि अनुदानाची उधळपट्टी कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.