Tue, Jul 23, 2019 02:04होमपेज › Sangli › प्रणाली पाटील आत्महत्या; दोघा तरुणांना अटक

प्रणाली पाटील आत्महत्या; दोघा तरुणांना अटक

Published On: Feb 01 2018 1:38AM | Last Updated: Jan 31 2018 11:51PMतासगाव : शहर प्रतिनिधी

येथील शासकीय महिला तंत्रनिकेतनमधील विद्यार्थिनी प्रणाली प्रकाश पाटील (वय 17, रा. साखराळे, ता. वाळवा) हिच्या आत्महत्येप्रकरणी  दोन तरुणांना तासगाव पोलिसांनी बुधवारी अटक केली. धनंजय अनिल चोपडे (वय 20, रा. वासुंबे, ता. तासगाव) व निखिल नंदकुमार पाटील (वय 20, रा. शिवनेरीनगर, कुपवाड, ता. मिरज) अशी त्यांची नावे आहेत. प्रणालीच्या चिठ्ठीत त्यांची नावे आढळून आली आहेत, असे पोलिसांनी सांगितले. 

प्रणाली हिने दि.20 जानेवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र, या आत्महत्येला आता वेगळे वळण लागले आहे. पोलिस तपासात प्रणालीच्या कपाटामध्ये आत्महत्या करण्यापूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. त्यावरून तपास करताना पोलिसांनी आज दोघांविरुद्ध कारवाई केली आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये आणखी काही जण असावेत, अशी शक्यता पोलिस उपनिरीक्षक प्रियांका सराटे यांनी व्यक्‍त केली. 

तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः प्रणाली ही येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ड्रेस डिझाईनर शाखेत द्वितीय वर्षात शिकत होती. तिची व धनंजय, निखिल या दोघांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती.  दि. 16 जानेवारीला तिचा वाढदिवस होता. तेेव्हापासून ती निराश होती. जवळच्या मैत्रिणींना तिने ‘मला मरायचे आहे’, असेही म्हणून दाखवले होते. 

दि. 20 रोजी सर्व मैत्रिणी गावाला गेल्या होत्या. त्यावेळी प्रणालीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी तिने चिठ्ठीमध्ये ‘धनंजय, तू माझा छळ केलास, तुझ्या त्रासाला कंटाळून मी माझे जीवन संपवत आहे. माझ्या घरच्यांपासून मी कायमची लांब जात आहे, असे लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले.

कपाटात सापडलेल्या प्रणालीच्या चिठ्ठीमुळे आता या प्रकाराला वेगळे वळण लागले आहे. तर आणखी काहीजण यामुळे संशयाच्या भोवर्‍यात आले आहेत. तपासात लवकरच त्यांचाही सहभाग स्पष्ट होईल, असेे पोलिसांकडून सांगण्यात आले.