Thu, Jul 18, 2019 12:55होमपेज › Sangli › पोस्टर हटविल्यावरून महापालिकेत राडा

पोस्टर हटविल्यावरून महापालिकेत राडा

Published On: Apr 17 2018 1:51AM | Last Updated: Apr 17 2018 1:51AMसांगली : प्रतिनिधी

येथील आंबेडकरनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लावण्यात आलेले फलक सोमवारी पहाटे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटविले. यावरून संतप्त कार्यकर्त्यांनी महापालिकेवर हल्लाबोल केला. त्यांनी मोटारसायकल रॅली काढून महापालिकेत घुसून प्रभाग समितीच्या कार्यालयाची तोडफोड केली. 

संतप्त कार्यकर्त्यांनी अतिक्रमण निर्मूलन पथकाचे अधिकारी दिलीप घोरपडे यांना जाब विचारत कार्यालयातून ओढून मारहाण केली. या मारहाणीत घोरपडे गंभीर  जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. कार्यालयाचेही मोठे नुकसान झाले आहे.  यावेळी नगरसेवक प्रशांत मजलेकर, सचिन कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी तोडफोड करणार्‍यांना अडवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी महापौर हारुण शिकलगार, पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर, शहर निरीक्षक रवींद्र शेळके, उपायुक्‍त सुनील पवार आदींनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना शांत केले. या प्रकारामुळे महापालिकेत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.

येथील आंबेडकरनगर येथे डॉ. आंबेडकर जयंतीचे डिजिटल पोस्टर लावण्यात आले होते. हे फलक अधिकार्‍यांच्या सांगण्यावरून सोमवारी पहाटेच्या सुमारास श्री. घोरपडे यांच्यासह पथकाने हटविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दोन-तीन पोस्टर हटविले होते. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक युवकांनी त्याला विरोध केला. दरम्यान, या प्रकरणामुळे तणाव होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिस व महापालिका प्रशासनाने ते फलक पुन्हा पूर्ववत बसविले.

दरम्यान सोमवारी सकाळी आंबेडकरनगर येथील युवक व आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते एकत्र आले. दुपारी बाराच्या दरम्यान ते सर्वजण अधिकार्‍यांना जाब विचारण्यासाठी घोषणाबाजी करीत महापालिकेत पोहोचले. यावेळी प्रमुख नेते सुरेश दूधगावकर, किरणराज कांबळे, महोत्सव समितीचे पदाधिकारी, स्वाभिमानीचे गटनेते जगन्नाथ ठोकळे यांनी याप्रकरणी महापौर हारूण शिकलगार यांना निवेदन दिले.

महापौर शिकलगार हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करीत होते. त्याचवेळी काही युवकांना श्री. घोरपडे प्रभाग समिती एकमध्ये बसल्याची माहिती मिळाली. त्यांनी थेट कार्यालयात घुसून श्री. घोरपडे यांना केबिनाधून बाहेर ओढले. जाब विचारत थेट त्यांना मारहाण सुरू केली. काहीजणांनी त्यांना लाथा-बुक्क्याने मारहाण केली. दोघा-तिघांनी प्लास्टिकच्या खुर्च्यां घोरपडे डोक्यात मारल्या.  जमावातील काहीजणांनी कार्यालयातील टेबल, संगणक, टेलिफोन उधळून लावत तोडफोड सुरू केली. 

अचानक झालेल्या या हल्ल्याने कार्यालयातील कर्मचारी, महिलांची धावपळ उडाली. दहा-पंधरा मिनिटात झालेल्या या हल्ल्यात कार्यालयातील काचांचाही चुराडा करण्यात आला. मारहाणीत  घोरपडे हे गंभीर जखमी झाले. 

या प्रकाराची माहिती मिळताच श्री. शिकलगार पोलिस फौजफाट्यासह महापालिकेत धावले. त्यांनी तत्काळ महापालिकेची दारे बंद करून मारहाण करणार्‍यांंची झाडाझडती घेतली. तसेच मध्यस्थी करून घोरपडे यांना युवकांच्या तावडीतून सोडविले. यानंतर श्री. शिकलगार यांच्यासमवेत श्री. शेळके, सुनील पवार  यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करा

आंदोलकांनी शिकलगार यांना निवेदन दिले. यामध्ये अधिकारी श्री. घोरपडे यांनी मध्यरात्री फलक काढून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.त्यांनी आंबेडकरवादी जनतेचा अपमान केला आहे. त्यामुळे या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. निवेदनावर जयभीम व्यायाम मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, सचिव रोहित शिवशरण, किरणराज कांबळे यांच्या सह्या आहेत.

Tags : sangli, poster remove issue,municipal office, attack, sangli news,