Wed, Aug 21, 2019 15:17होमपेज › Sangli › आयुक्‍त कार्यालयाचे पाणी, वीज बंद का करू नये?

आयुक्‍त कार्यालयाचे पाणी, वीज बंद का करू नये?

Published On: Feb 06 2018 1:49AM | Last Updated: Feb 05 2018 10:47PMसांगली : प्रतिनिधी

कृष्णा नदीत शहराचे सांडपाणी सोडून प्रदूषण केल्याबद्दल सोमवारी उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावली आहे, असे अधिकारी लिंबाजी भड यांनी सांगितले. वारंवार प्रदूषणाबद्दल नोटीस बजावूनही गांभीर्याने उपाययोजना केल्या नाहीत. त्याबद्दल जलप्रदूषण अधिनियम कायद्यांतर्गत आयुक्‍त कार्यालयाचा वीज व पाणीपुरवठा का खंडित करू नये, असे नोटिसीत बजावल्याचे त्यांनी सांगितले. 

कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणात शहराचे सांडपाणी मिसळते. त्याची कमाल मर्यादा ओलांडल्यामुळे सांगलीत रविवारी नदीतील मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले. मृत माशांचा थर मोठ्या प्रमाणात पाण्यावर तरंगून दुर्गंधी पसरली होती. शिवाय नदीत पाणीपातळीने तळ गाठल्याने गटारीसारखी अवस्था झाली आहे. यापूर्वीही अनेकदा अशी अवस्था होऊन मासे मृत होण्याच्या घटना घडल्या आहेत.

भड म्हणाले, अनेकवेळा यासंदर्भात महापालिकेला सूचना दिल्या, नोटीस बजावली आहे. वार्षिक दीड कोटी रुपयांचा दंडही केला आहे. तरीही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. पाण्यातील प्राणवायू नष्ट झाल्याने जलचर प्राणी मरत आहेत. तरीही  मनपा प्रशासन सुस्तच आहे, रविवारीही असाच प्रकार घडला. यामुळे आम्ही रविवारी दुपारी नदीची पाहणी करून पंचनामा केला. पाण्याचे नमुनेही तपासणीला घेतले होते. 

ते म्हणाले, शेरीनाल्याच्या सांडपाण्याचीही पाहणी केली. पाण्याचा प्रवाह वाढल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आम्ही महापालिकेला सोमवारी नोटीस बजावली. महापालिकेने तातडीने शेरीनाल्याचे नदीत मिसळणारे सांडपाणी रोखावे. अन्यथा जलप्रदूषण कायद्यान्वये आयुक्‍त कार्यालयाचा वीज व पाणीपुरवठा का खंडित करू नये, असा नोटिसीद्वारे इशारा दिला आहे.