होमपेज › Sangli › वारणा टापूत राजकीय हवा गरम!

वारणा टापूत राजकीय हवा गरम!

Published On: Jan 25 2018 1:01AM | Last Updated: Jan 24 2018 8:28PMबागणी : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांत अवघ्या वारणा टापूतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.  ज्येष्ठ नेते नानासाहेब महाडिक, माजी जि. प. सदस्य राहुल महाडिक यांनी पुन्हा एकदा  दंड थोपटून बागणीत ‘एन्ट्री’ केली आहे. तर फाळकेवाडीतील कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ‘गट्टी’ जमल्याचे चित्र आहे.        

वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर बागणी जिल्हा परिषद मतदारसंघ विलक्षण चर्चेत आला आहे. जि. प. साठी येथे  माजी आमदार विलासराव शिंदे यांनी प्रतिष्ठा आणि ताकद पणाला लावून देखील वैभव शिंदे यांचा पराभव झाला. तर विरोधकांना बागणीत ‘संधी’ खुणावू लागली. यातूनच ज्येष्ठ नेते  नानासाहेब महाडिक, माजी जि. प. सदस्य राहुल महाडिक यांनी  वनश्री नानासाहेब महाडिक मल्टिस्टेट अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या बागणी शाखेचे उद्घाटन ‘एक से बढकर एक’ अशा राष्ट्रवादी विरोधक नेत्यांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात करून ‘इरादा’ स्पष्ट केला आहे.  राहुल महाडिक यांनी सन 2002 च्या जि. प. निवडणुकीत आपला ‘करिश्मा’ दाखवून दिला होता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या हातातून हा जि. प. चा बालेकिल्ला त्यांनी हिसकावून घेतला होता. राहुल यांनी आता शिक्षण संस्था आणि क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून ‘ताकद’ उभी केली आहे. तर या सार्‍याच्या बळावर आता  विधानसभेसाठी राहुल महाडिकच. ‘आता नाही तर पुन्हा नाही’, अशी महाडिक समर्थकांची भूमिका होऊ लागली आहे.  

अर्थात बागणी आणि सारा परिसर हा राष्ट्रवादीसाठी पर्यायाने माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यासाठी बालेकिल्ला मानला जातो. मात्र थेट सरपंच निवडीत, जि. प. निवडणुकीत राष्ट्रवादीला या भागात चांगलीच पिछेहाट सोसावी लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर या भागातील आपली आघाडी कायम ठेवण्याचे राष्ट्रवादीसाठी आव्हान ठरणार आहे.

खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादीचे दिग्गज जि. प. सदस्य संभाजी कचरे यांनी फाळकेवाडीत एकत्रितरित्या विकासकामांचे उद्घाटन आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकार्‍यांचे सत्कार करुन आपली ‘गट्टी’ जमल्याचे स्पष्ट केले आहे.  या सार्‍यांमुळे वारणा टापूत मात्र राजकीय हवा चांगलची तापू लागली आहे.