Thu, Jun 27, 2019 18:35होमपेज › Sangli › पोलिसाचा खून : मुख्य हल्लेखोर कोल्हापुरात अटक

पोलिसाचा खून : मुख्य हल्लेखोर कोल्हापुरात अटक

Published On: Jul 19 2018 10:12AM | Last Updated: Jul 19 2018 10:12AMसांगली : प्रतिनिधी

गणवेशातील पोलिस शिपाई समाधान मांटे यांच्या खुनातील मुख्य संशयित झाकीर जमादार याला बुधवारी रात्री उशिरा कोल्हापुरात अटक करण्यात आली. राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक मानसिंग खोचे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. यातील दोन संशयितांना बुधवारी सांगली एलसीबीने अटक केली आहे.

सांगलीतील कुपवाड रस्त्यावरील रत्ना डिलक्स हॉटेलमध्ये दारूच्या बिलावरून झालेल्या वादातून समाधान मांटे यांचा मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. पोलिसाचा खून झाल्याने खळबळ उडाली होती. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी याबाबत तातडीने तपास करून संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर एलसीबीने राजू नदाफ, अन्सार पठाण या दोघांना अटक केली होती. सांगलीचे पोलिस मुख्य हल्लेखोर झाकिरच्या शोधात होते. बुधवारी रात्री उशिरा त्याला राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी दुपारी त्याला सांगली पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. 

झाकीर करणार होता आत्महत्या

दरम्यान पोलिस शिपाई समाधान मांटे यांचा खून केल्यानंतर झाकिरला पश्चाताप होत होता. त्याची मानसिक स्तिथीही ठीक नव्हती. तो आत्महत्या करण्याच्या मनस्तिथीत होता. मात्र कोल्हापूर पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतले.