होमपेज › Sangli › मिरजेत दोन सावकार पोलिसांच्या ताब्यात

मिरजेत दोन सावकार पोलिसांच्या ताब्यात

Published On: May 11 2018 2:16AM | Last Updated: May 10 2018 11:53PMमिरज : शहर प्रतिनिधी 

येथील दोन सावकारांविरुद्ध शहर पोलिसांनी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल केला. उमेश कृष्णा जाधव (रा. कमान वेस, माळी गल्ली),  अनिकेत प्रल्हाद मोरे (रा. मंगळवार पेठ, झारी मस्जिदजवळ) अशी त्या दोघांची नावे आहेत. रात्री उशिरा त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांनी एका महिलेला व्याजाने पैसे देऊन दहा लाख रुपये उकळले आहेत.

याबाबत मंगल चंद्रकांत भोसले या महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. उमेश व अनिकेत या दोघांनी मंगल भोसले यांना डिसेंबर2014 मध्ये साडेतीन लाख रुपये मासिक दहा टक्के व्याजाने दिले होते. त्यानुसार मंगल यांनी त्यांना प्रत्येक महिन्याला पस्तीस हजार रुपये व्याज दिले होते. साडेतीन लाख रुपयांच्या कर्जापोटी त्यांनी नऊ लाख ऐंशी हजार रुपये वसूल केले होते. एवढे पैसे वसूल होऊनही त्यांनी दोन लाख रुपये मुद्दल मंगल यांच्याकडे मागितली होती. त्यादरम्यान या सावकारांनी मंगल यांची दुचाकी काढून नेली होती.

मुद्दलातील राहिलेले दोन लाख रुपये मिळविण्यासाठी त्या सावरकरांनी मंगल यांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यांच्या जाचाला कंटाळून आज मंगल यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी उमेश व अनिकेत यांच्यावर गुन्हा दाखल केला.