Wed, Jan 22, 2020 22:19होमपेज › Sangli › पालकत्वाच्या मायेने कुटुंबीय सद‍्गदित

पालकत्वाच्या मायेने कुटुंबीय सद‍्गदित

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 24 2017 12:02AM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

पोलिस कोठडीत हत्या झालेल्या अनिकेत कोथळेची मुलगी प्रांजल व त्याची पत्नी संध्याचे पालकत्व शनिवारी हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी अधिकृतरीत्या स्वीकारले. यासाठी शनिवारी त्या सांगलीत आल्या होत्या. त्यांच्या पालकत्वाच्या उबीने संपूर्ण कुटुंबीय सद‍्गदित झाले होते. यावेळी पाटील यांनी सहकुटुंब येऊन कोथळे परिवाराला धीर दिला. एका पोलिसाने मारले अन् दुसर्‍या पोलिसाने तारले, अशीच चर्चा यावेळी होती. हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील यांनी गेल्या महिन्यातच अनिकेतची मुलगी प्रांजलचे पालकत्व स्विकारणार असल्याचे जाहीर केले होते. त्या मूळच्या कोल्हापूर येथील आहेत. आज त्या पती, भाऊ, दीर, भावजय, मित्र परिवार यांच्यासह सांगलीत आल्या होत्या. त्यांनी घरात प्रवेश करताच प्रांजलसाठी आणलेले नवीन कपडे, खेळणी पाहून तिचा चेहरा खुलला होता. 

अनिकेतच्या खुनाची घटना दुर्दैवी असून त्याची मुलगी आणि पत्नी निराधार होऊ नयेत यासाठी आपण पालकत्वाची जबाबदारी स्विकारत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्या म्हणाल्या, प्रांजलचा संपूर्ण शैक्षणिक  खर्च केला जाईल. तिला चांगले उच्च शिक्षण देण्यात येईल. शिवाय तिच्या विवाहाचा खर्चही  करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अनिकेतची पत्नी संध्याला शासकीय नोकरी न मिळाल्यास त्यांच्या शैक्षणिक संस्थेत नोकरी देण्याची तयारीही पाटील यांनी यावेळी दर्शविली. 

यावेळी पाटील यांचे पती, देवेन जरग, संग्राम जरग, प्रफुल्ल जरग, विक्रम जरग यांच्यासह त्यांची मुले, मित्र परिवारही उपस्थित होता. यावेळी मंगेश चव्हाण, राष्ट्रवादीचे सचिव मनोज भिसे, आशिष कोथळे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.