Fri, Apr 19, 2019 08:44होमपेज › Sangli › सोनीत विषमुक्त पेरू, द्राक्षांची शेती

सोनीत विषमुक्त पेरू, द्राक्षांची शेती

Published On: Jun 19 2018 1:25AM | Last Updated: Jun 18 2018 7:45PMमातीतलं सोनं : विवेक दाभोळे

बदलत्या काळात शेतीत नवीन प्रवाह येत आहेत. विषमुक्त, रसायनुमक्त शेतीची उत्पादन संकल्पना आता शेतकर्‍यांना भावू लागली आहे. तर आरोग्याबाबत जागरूक असलेला ग्राहक देखील रसायनमुक्त शेतीउत्पादनांना वाढती पसंती देऊ लागला आहे. अशा काळात या बदलाचा वेध घेत की काय सोनी येथे विजय रंगराव मोरे या जिगरबाज तरूण शेतकर्‍याने रसायनमुक्त शेतीचा प्रयोग सुरू केला आहे. केवळ एवढ्यावरच न थांबता त्यांनी यात पेरू,  द्राक्षाचे उत्पादन घेतले आहे. यात अर्धा एकर शेतीतून त्यांना किमान दीड लाखाच्या पेरूचे उत्पादन अपेक्षित आहे.

मिरज पूर्व भागातील सोनी गावाची खरी तर  दर्जेदार आणि विलक्षण गोडीच्या द्राक्षासाठी ओळख आहे. सोनीच्या द्राक्षांना बाजारात हमखास चांगला दर मिळणार, हे समीकरणच बनले आहे. याच गावातील विजय मोरे यांनीही शेतीत नवीन संकल्पना, प्रयोग राबविताना ‘झिरो बजेट’ शेतीची कल्पना मनात घेतली. झिरो बजेट शेतीमधील मार्गदर्शन सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नैसर्गिक शेती करण्यास सुरूवात केली आहे. झिरो बजेट शेतीमुळे खर्च जवळजवळ नाहीत. रासायनिक, सेंद्रिय खतांचा वापर टाळून त्यांनी केवळ  जीवामृत आणि शेणखताचा वापर केला आहे. शेतात विहीर असून पाण्यासाठी त्यांनी फवारापद्धत अवलंबली आहे. 

सहा महिन्यापूर्वी मोरे यांनी आपल्या शेतीत लखनौ वाणाच्या पेरूची लागवड केली आहे. अर्धा एकरात जवळपास पाचशे रोपे बसविली आहेत. आता  पहिला बहार संपतो आहेे. येणार्‍या हंगामात यात पेरूचे जवळपास दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पादन अपेक्षित आहे. विशेष महत्वाचे म्हणजे यासाठी त्यांनी अगदी चिमूटभर देखील रासायनिक खत अथवा सेंद्रिय खतांचा वापर केलेला नाही. केवळ जीवामृत आणि शेणखताचा वापर करून त्यांनी आपल्या शेतीत पेरूची बाग फुलविली आहे. या शेतीतील पेरू देखील विलक्षण चकाकी असलेला आणि अन्य पेरूपेक्षा नक्कीच जादा गोडी आणि चकाकी असल्याचे जाणवते.  याखेरीज त्यांनी आपल्या तीन एकराच्या दुसर्‍या क्षेत्रात झिरोबजेट शेती संकल्पनेवरच द्राक्षाची बाग केली आहे.विजय मोरे या तरुण शेतकर्‍याने बदलाचा वेध घेत झिरो बजेट शेतीची संकल्पना राबविताना रसायनमुक्त शेती आणि विषमुक्त अन्नाचे उत्पादन साकारताना अन्य शेतकर्‍यांसमोर नाविण्याचा एक आदर्श ठेवला आहे, असे म्हटले तर ते फारसे चुकीचे ठरणार नाही. 

थेट मार्केटिंग पुणे-मुंबई 

उत्पादित रसायन आणि विषमुक्त पेरू, चिकू तसेच आंब्याचे हंगामनिहाय मार्केटिंगसाठी मोरे यांनी राज्यभरात पसरलेल्या झिरोबजेट नैसर्गिक शेतीसंबंधित व्हॉटस्अ‍ॅप् गु्रपच्या माध्यमातून थेट मार्केटिंगला प्राधान्य दिले आहे.  प्रामुख्याने पुणे  आणि मुंबईत थेट मार्केटिंगवर त्यांचा भर राहिला आहे. जरी यातून पिकांचे उत्पादन कमी मिळत असले तरी तुलनेने जादा दर असल्याने एकूण उत्पन्न हे अधिकच ठरत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

फळपिकांची मिश्रशेती

रसायनमुक्त शेती आणि विषमुक्त अन्नधान्य उत्पादनाची शेती साकारताना मोरे यांनी पेरूच्या बागेतच चिकूची तीनशे, देश आंब्याची 500 तसेच सीताफळाची 100 रोपे लावली आहेत. ही झाडे चांगली आल्याचा त्यांचा अनुभव आहे.  एवढ्यावरच न थांबता त्यांनी शेवग्याची जवळपास 200 झाडे लावली आहेत. यासाठी काहीही खर्च न करता त्यांना शेवग्याच्या शेंगापासूनचे साडेचार हजार रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. शेवग्याचे हे उत्पन्न बोनस ठरले.