होमपेज › Sangli › इतिहासाचे वाचन नसल्याने सामाजिक स्थिती बिघडतेय

इतिहासाचे वाचन नसल्याने सामाजिक स्थिती बिघडतेय

Published On: Jan 11 2018 1:08AM | Last Updated: Jan 10 2018 10:36PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

देशातील आजची राजकीय, सामाजिक परिस्थिती पाहता सोशल मीडियावर दिसतो तोच खरा इतिहास आहे, असे तरुणांना वाटते. इतिहासाचे सखोल वाचन नाही. नेमका इतिहास काय? त्या-त्या काळात झालेली वैचारिक मंथने याची काहीही माहिती नसल्याने तरुणांचा बुद्धीभेद होत आहे. इतिहासाचे सखोल वाचन नसल्याने आजची परिस्थिती उद्भवली आहे, असे प्रतिपादन कवयित्री निरजा यांनी केले. 

जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व राजमती सार्वजनिक ग्रंथालयातर्फे राजमती भवन येथे ग्रंथमहोत्सव सुरू आहे. ‘पाठ्यपुस्तकातील साहित्यिक आपुल्या भेटीला’ या विषयावर कवयित्री निरजा यांची मराठी अध्यापक संघाचे विठ्ठल मोहिते यांनी मुलाखत घेतली. 

निरजा म्हणाल्या, आज विचार करायला लावणारे वाचन होत नाही. आजची राजकीय, सामाजिक परिस्थिती पाहिली तर सोशल मीडियावर दिसतो तोच इतिहास आहे, असे वाटते.  इतिहासात कायम मोडतोड केली जाते. त्यातून आजची परिस्थिती उद्भवत आहे. चुकीच्या माहितीवरून तरुणांचा बुद्धीभेद होत आहे. वरवरच्या वाचनाने इतिहास समजून येत नाही. इतिहासाचे सखोल वाचन आवश्यक आहे. केवळ ग्रंथ महोत्सव भरवण्याने परिस्थती सुधारणार नाही. ग्रंथमहोत्सवात कोणते ग्रंथ आहेत. कोणते ग्रंथ विकत घेता?, काय वाचता हे ही महत्वाचे आहे. संविधानात जात आणि लिंग समानता आहे. जात, लिंग समानतेबाबत फक्त बोलले जाते. प्रत्यक्षातील व्यवहार मात्र समानतेचा नाही. जात आणि लिंग समानतेच्या केवळ चर्चा होत असल्याकडेही निरजा यांनी लक्ष वेधले. जातीवरून व्यक्तीची ओळख ठरू नये. त्याचे विचार व कर्म यावरून माणसाची ओळख ठरावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले. निरजा म्हणाल्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिला शिकल्या. ज्ञानी झाल्या. मात्र स्त्रिया परंपरेच्या जोखंडातच अधिक गुंतत आहेत. 

उच्चवर्गीय  स्त्रिया  व्रतवैकल्यातून बाहेर पडल्या. बहुजन स्त्रियांमध्ये मात्र व्रतवैकल्ये वाढली आहेत. पूर्वी नसलेल्या व्रतवैकल्यांचीही भर पडली आहे. स्त्रियांमध्ये मनुस्मृतीचा पगडा अजुनही कायम असल्याचे चित्र दिसत असल्याची खंतही निरजा यांनी व्यक्त केली.