Wed, Mar 20, 2019 23:13होमपेज › Sangli › आनंदाचे क्षण स्वतः निर्माण करा : रामदास फुटाणे

आनंदाचे क्षण स्वतः निर्माण करा : रामदास फुटाणे

Published On: Mar 01 2018 1:28AM | Last Updated: Feb 28 2018 10:07PMसांगली : प्रतिनिधी

कोणाच्याही आयुष्यात दु:खाचे, संकटाचे क्षण सांगून येत नाहीत. मात्र प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यात आनंदाचे क्षण ठरवून निर्माण करा, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, वात्रटिकाकार आणि माजी आमदार रामदास फुटाणे यांनी येथे केले. 

जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त डॉ. अनिल मडके यांनी    आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जाहीर कवितांच्या कार्यक्रमास फाटा देत झालेल्या श्रोत्यांशी संवादाचा कार्यक्रम झाला. त्यात त्यांनी कविता आणि वात्रटिका सादर करीत प्रश्‍नांनाही खुमासदार उत्तरे दिली. त्यांच्या कविता आणि वात्रटिकांना उपस्थितांनी दाद दिली. 

इंटरनेट, संगणकाच्या युगात मराठी साहित्याच्या अस्तिवाबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर ते म्हणाले, ‘तंत्रज्ञान कितीही नवीन आले तरी बोलणारे आणि ऐकणारे कायम राहणार आहेत. कागद, पुस्तकांचे तंत्रज्ञान हे गेल्या पाचशे वर्षातील आहे. त्यापूर्वी सुद्धा श्रवणभक्ती होतीच. तंत्रज्ञानामुळे आता आनंदाच्या जागा बदलत आहेत. ज्ञान लालसा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र यातून आपण अमेरिकेतल्या प्रमाणे रोबो मशीनप्रमाणे आपली मुले तयार होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा आपल्याकडेही वृद्धाश्रमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याशिवाय राहणार नाही.’

साहित्य संमेलन अध्यक्षांच्या निवडीबद्दल ते म्हणाले, ‘एक हजारपैकी पाचशे मतदारांचा साहित्याशी कोणताच संबंध येत नाही. पुस्तक लिहणारे, पुरस्कार मिळवणारे अनेकजण या मतदान प्रक्रियेत नाहीत. सीमा प्रश्‍नासारखे अनेक ठराव वर्षानुवर्षे संमेलनात होत आहेत. त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. मी जागतिक मराठी परिषदेतही काम करीत आहे. त्या परिषदेच्या ‘शोध मराठी मनाचा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकांचे माहित नसलेले पैलू समोर आणण्याचा प्रयत्न करतो. सुबोध कुलकर्णी यांनी विकिपिडियाचे महत्व, त्याचे उपयोग  याची माहिती दिली. नामदेव माळी, महेश कराडकर, डॉ. मोहन पाटील, प्रा. संजय ठिगळे उपस्थित होते.