Sat, Apr 20, 2019 10:01होमपेज › Sangli › सातशेवर रेशन दुकानांचा परवाना रद्द करणार 

सातशेवर रेशन दुकानांचा परवाना रद्द करणार 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा


सांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 1 हजार 356 स्वस्त धान्य दुकानदारांपैकी 735 जणांनी अद्याप एप्रिल महिन्याचे धान्य उचललेले नाही. त्यांनी तातडीने धान्य न उचलल्यास परवाना रद्द करण्याचा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी दिला आहे. दरम्यान, रद्द केलेले परवाने बचत गटास देऊन पर्यायी व्यवस्था करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. 

शासनाने स्वस्त धान्य वितरणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व दुकानदारांना पॉस मशीन देण्यात आली आहेत. त्या शिवाय 70 टक्के रेशनकार्ड धारकांचे आधार लिंक करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित कार्डधारकांचे बोटांचे ठसे घेऊनच धान्य दिले जात आहे. त्यामुळे धान्य वितरणात पूर्वी होणार्‍या गैरप्रकारांना चाप बसला आहे. शासनाचे धान्य मोठा प्रमाणात वाचत आहे. दरम्यान, दुसर्‍या बाजूला रेशन दुकानदारांनी मात्र आठ दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. शासकीय सेवेत सामावून घ्यावे, यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.  दुकानदारांकडून पुढील महिन्यासाठीचे धान्य   महिनाअखेरीस उचलले जाते. सात ते पंधरा तारखेच्या दरम्यान या धान्याचे वाटप संबंधित ग्राहकांना केले जाते. मात्र यावेळी दुकानदारांनी  धान्य न उचलण्याचा निर्णय घेत आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे कार्ड धारकांना वेळेत धान्य मिळण्याबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पुरवठा अधिकार्‍यांनी संबंधित दुकानदारांनी धान्य न उचलल्यास परवाना रद्द करण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 356 परवाने आहेत. त्यापैकी  621 दुकानदारांनी या महिन्यासाठीचे  धान्य उचलले आहे. अन्य दुकानदारांनी  ते उचललेले नाही. त्यांनी तातडीने धान्य न उचलल्यास अन्नसुरक्षा कायदा 2013 अंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

Tags : Sangli, sangli News, over, seven hundred, Ration shops, canceled 


  •