होमपेज › Sangli › द्राक्षउत्पादकांची फसवणूक थांबणार तरी कधी?

द्राक्षउत्पादकांची फसवणूक थांबणार तरी कधी?

Published On: Mar 22 2018 1:32AM | Last Updated: Mar 21 2018 9:00PMतासगाव : प्रमोद चव्हाण

तासगाव तालुक्यात गेल्या वर्षी 46 द्राक्षउत्पादक शेतकर्‍यांची 9 कोटी 47 लाखांची फसवणूक झाली होती. ही सर्व फसवणूक करणारे 90 टक्के व्यापारी हे परराज्यातील होते. यावर्षीचा हंगाम जानेवारी महिन्यापासून सुरू झाला. मात्र महिन्याभरातच तालुक्यातील बोरगाव व मणेराजुरी आदी गावांतील शेतकर्‍यांना परराज्यातील व्यापार्‍यांनीच लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.

तालुक्यात द्राक्ष खरेदीसाठी शेकडो व्यापारी  येत असतात.  द्राक्षे हा नाशवंत शेतीमाल आहे. ताजी असतानाच किंबहुना अजून बागेत असतानाच ती शेतकर्‍यांना विकावी लागतात. मिळेल त्या दराने समोर येईल त्या व्यापार्‍याला द्राक्षे विकावी लागतात. शेतकर्‍यांच्या या अडचणीचा काही व्यापारी गैरफायदा घेतात, असा अनुभव वारंवार येतो आहे. 

चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपूर्वीपासून तासगाव तालुक्यात द्राक्षशेतीला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात या तालुक्यात द्राक्षाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. परराज्यात आणि विदेशांतही  तासगावच्या द्राक्षांची ओळख आहे.  द्राक्षे आणि बेदाण्याची कोट्यवधींची उलाढाल दरवर्षी होते, मात्र अद्यापि द्राक्षांच्या विक्रीची पध्दतशीर व्यवस्था तयार झालेली नाही. बेदाण्याचे मार्केट बर्‍यापैकी स्थिर झाले आहे. त्याच्या विक्रीचे बाजार समिती नियंत्रणही करते,  मात्र द्राक्षमार्केटकडे लोकप्रतिनिधी, प्रशासन, पोलिस, बाजार समिती या सर्वांचेच आजपर्यंत दुर्लक्ष झालेले आहे. 

काही व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची फसवणूक होण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे तालुक्यात द्राक्षखरेदीसाठी आलेल्या प्रत्येक व्यापार्‍याची लेखी नोंद, ओळखपत्र पोलिस ठाण्यात ठेवण्यात येणार होते. त्यासाठी प्रत्येक गावातील पोलिसपाटील व तालुक्यातील लॉजमालकांनाही आवश्यक ती कागदपत्रे घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.  पोलिस उपअधीक्षक अशोक बनकर यांनी गावोगावी बैठका घेऊन किंवा शेतकर्‍यांना पोलिस ठाण्यात बोलावून शेतकरी, पोलिस पाटील यांना याबाबत सूचना केली होती. 

मात्र प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर पोलिस अधिकार्‍यांच्या आदेशाला कोलदांडा देण्याचे काम केले  असल्याचे समोर आले आहे. तासगाव पोलिस ठाण्यात सावळज, वंजारवाडी, राजापूर व लोकरेवाडी या केवळ 4 गावातील 14 द्राक्ष व्यापार्‍यांची नोंद आहे.  मात्र ही नोंद प्रत्यक्षात कोणत्याही नोंदवहीला घेण्यात आली नसल्याचे पोलिसांकडूनच सांगण्यात आले.

शेतकर्‍यांची द्राक्षे किंवा बेदाणे विक्रीत फसवणूक होऊ नये ही तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचीही जबाबदारी आहे. मात्र अशी फसवणूक टाळण्यासाठी बाजार समितीने नेमके कोणते प्रयत्न केले ते अद्यापि समजलेले नाही. बाजार समितीकडे कोणत्याही व्यापार्‍यांची नोंद नाही. या हंगामात आजपर्यंत  सुमारे  80 लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. कोणीही याबाबत कसलीच नोंद न ठेवल्याने परराज्यातील काही व्यापारी शेतकर्‍यांची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे शेतकरी धास्तावलेले आहेत.

Tags : Snagli, Sangli News,out of state businessmen, cheated, local farme