Thu, Jan 17, 2019 10:13होमपेज › Sangli › एकतर्फी प्रेमातून युवतीवर खुनीहल्‍ला

एकतर्फी प्रेमातून युवतीवर खुनीहल्‍ला

Published On: Jan 29 2018 1:31AM | Last Updated: Jan 28 2018 11:48PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

वाळवा तालुक्यातील ताकारी येथे एकतर्फी प्रेमातून युवती व तिच्या भावावर तलवारीने खुनीहल्‍ला केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी शुभम राजेंद्र पवार (वय 21, रा. दत्त मंदिर, ताकारी) याच्यावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित युवती इस्लामपूर येथे शिक्षण घेते. ती ताकारीतून इस्लामपूरला शिक्षणासाठी ये-या करते. संशयित शुभम दोन वर्षापासून तिला त्रास देत होता. युवतीच्या नातेवाइकांनी शुभमला याबाबत वारंवार समज दिली होती. त्यातून त्यांचा वाद वाढत गेला होता. 

शनिवारी रात्री शुभम हा युवतीच्या घरामध्ये गेला. ‘तुम्हाला जिवंत ठेवणार नाही,’ असे म्हणत त्याने हातातील तलवारीने युवतीच्या भावावर वार करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे युवतीचा भाऊ आरडा-ओरडा करू लागला. यावेळी युवती व तिची आजी भावाला सोडविण्यासाठी आल्या. त्यावेळी शुभमने युवतीच्या डोक्यावर तलवारीने वार केला. त्यामध्ये युवती व तिचा भाऊ गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहायक पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे अधिक तपास करीत आहेत.