Tue, May 21, 2019 22:42होमपेज › Sangli › खुनाचा प्रयत्नः जतच्या एकास शिक्षा

खुनाचा प्रयत्नः जतच्या एकास शिक्षा

Published On: Feb 03 2018 2:15AM | Last Updated: Feb 02 2018 11:25PMसांगली ः प्रतिनिधी

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जतमधील एकास  दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. काकतकर यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले. 

संतोष राजाराम खांडेकर (वय 42, रा. जत) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.  पांडुरंग बाबासाहेब महारनूर (वय 43) हा खांडेकरच्या चुलत बहिणीचा मुलगा आहे. नातेवाईक असल्याने त्याचे खांडेकरच्या घरी येणे-जाणे होते. त्यामुळे 2010 पासून महारनूर व खांडेकरच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते. याबाबत खांडेकर व त्याच्या नातेवाईकांनी त्याला समज दिली होती. 

मात्र त्याच्या वागण्यात फरक पडला नव्हता. दि. 8 नोव्हेंबर 2014 रोजी रात्री  महारनूर खांडेकरच्या घरी गेला होता. ‘ मला दारू जास्त झाली आहे, त्यामुळे मी येथेच झोपतो’ असे त्याने खांडेकरच्या पत्नीला सांगितले.  त्यानंतर तो अंगणात जाऊन झोपला. पत्नी व मुले झोपल्याचे पाहून खांडेकर याने  दगडाने महारनूरच्या डोक्यात, तोंडावर, छातीवर मारहाण केली.   

जोरदार मारहाणीमुळे त्याच्या नाका-तोंडातून रक्त येत असल्याचे पाहून तो ठार झाल्याचे समजून खांडेकर तेथून  थेट पोलिस ठाण्यात गेला. तेथे त्याने हल्ल्याची घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी महारनूर जिवंत असल्याचे आढळले. त्याला तातडीने रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी खांडेकरवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा जत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला होता.  

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. यातील पंच, साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासी पोलिस अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. त्यांच्या साक्षी, पुराव्याच्या आधारे न्या. काकतकर यांनी संतोष खांडेकरला दहा वर्षांची सक्तमजुरी आणि पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली.