Sun, Feb 23, 2020 03:01होमपेज › Sangli › जत : विहिरीत पडून महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू 

जत : विहिरीत पडून महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू 

Published On: Aug 18 2019 8:19PM | Last Updated: Aug 18 2019 8:19PM
उटगी : प्रतिनिधी 

उटगी (ता.जत) येथे विहिरीत पाय घसरून पडून महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज (रविवार) घडली. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, उटगी येथील भारत हायस्कूल येथे इयत्ता १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी भोजप्पा कल्लाप्पा बरगुडे (वय वर्षे. १८) सध्या रा.उटगी, मुळ गाव मोसलगी, ता.अक्कलकोट,जि-सोलापूर हा रविवारी आपल्या तीन वर्ग मित्रासह उटगी ते जाडरबोबलाद रस्त्यावरील विहिरीमध्ये आपले कापडे धुण्यासाठी गेला होता. यावेळी भोजप्पाचा पाय घसरून तो ४० फुट खोल असणाऱ्या विहिरीत पडला. शेजारी असलेल्या तिन्ही वर्ग मित्रांनी  वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तोपर्यंत  भोजप्पा खोलवर पाण्यात बुडत गेला व दिसेनासा झाला.

सैरभैर झालेल्या मित्रांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. सदरची विहीर रस्त्यापासून ४० फुट अंतरावर असल्याने रस्त्यावरून जाणार्‍यांना नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच संजय माळकोटगी, सिद्राया संख, लोकप्पा केसगोंड, विजयकुमार बिराजदार, प्रदीप ननवरे, मलाप्पा चोंडीकर या युवकांनी मयत भोजप्पाचे प्रेत विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले, परंतु यश येत नव्हते.

घटनास्थळी माजी सभापती बसवराज बिराजदार, भारत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. शिवगोंडा पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी उमदी पोलिस उपनिरीक्षक नामदेव दांडगे यांनी विहिरीच्या पाण्यात उतरून त्‍याचा शोध घेतला असता,  काही वेळात मृत भोजप्पाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.