Mon, Sep 24, 2018 21:28



होमपेज › Sangli › वृद्धाशी लग्न करून तरुणी पसार

वृद्धाशी लग्न करून तरुणी पसार

Published On: Dec 19 2017 2:05AM | Last Updated: Dec 18 2017 11:37PM

बुकमार्क करा





मिरज : शहर प्रतिनिधी 

आंध्र प्रदेशातील एका वृद्धाशी लग्न करून त्यांच्या घरातील सोने व रोकड असा चार लाख रुपयांचा ऐवज लंपास करून विवाहिता फरार झाली आहे. या प्रकरणी मिरजेतील एका दाम्पत्याची आंध्र पोलिसांच्या पथकाकडून चौकशी सुरू आहे. यामध्ये फसवणूक करणार्‍यांचे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

फसवणूक झालेला वृद्ध हा पासष्ट वर्षांचा आहे. तो मूळचा राजस्थानचा असून सध्या आंध्रप्रदेशमध्ये व्यवसाय करतो. त्याचा विवाह मिरजेतील एका घरामध्ये आठ महिन्यांपूर्वी झाला होता. लग्न झालेली तरुणी  बत्तीस वर्षांची आहे. त्या दोघांचे लग्न करून देण्यासाठी मिरजेतील एका दाम्पत्याने पुढाकार घेतला होता. लग्न जुळवण्यासाठी त्या दाम्पत्याने साठ हजार रुपये त्यांच्याकडून घेतले होते. 

लग्न झाल्यानंतर तो वृद्ध व नवविवाहिता आंध्रप्रदेशमध्ये गेले. तेथे दोघांनी काही महिने संसार केला. मात्र ती तरुणी घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्या वृद्धाने तेथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

सोने व रोकड घेऊन पसार झाल्याने तिचा शोध आंध्रचे पोलिस घेत आहेत. त्यांच्या लग्नासाठी पुढाकार घेणारे दाम्पत्य मिरजेत असल्याचे समजल्यानंतर आज आंध्रप्रदेशमधील पोलिस उपनिरीक्षक, हवालदार व दोन महिला  पोलिस असे चौघांचे पथक आज मिरजेत आले. लग्न लावून दिलेल्या त्या दाम्पत्याकडे त्यांनी चौकशी केली.