Tue, May 21, 2019 04:04होमपेज › Sangli › जुन्या पेन्शनसाठी आता मंत्रालयावर धडक 

जुन्या पेन्शनसाठी आता मंत्रालयावर धडक 

Published On: Feb 04 2018 1:56AM | Last Updated: Feb 03 2018 8:45PMसांगली : प्रतिनिधी

दि. 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांसह सर्वच शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना व भविष्य निर्वाह निधी योजना लागू करावा, या मागणीसाठी प्राथमिक  शिक्षक संघातर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने दखल न घेतल्यास राज्यभरातील शिक्षक व कर्मचारी मंत्रालयावर धडक मोर्चा काढतील, असा इशारा देण्यात आला. 

जुन्या पेन्शनसाठी शिक्षक संघातर्फे शनिवारी राज्यव्यापी धरणे आंदोलन झाले. सांगलीतही या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. शिक्षक संघाच्या या आंदोलनात उर्दू शिक्षक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटनेने सक्रिय सहभाग घेतला. या आंदोलनाचे नेतृत्व शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी केले. राज्य उपाध्यक्ष हंबीरराव पवार, तानाजी खोत, अविनाश गुरव, पोपट सूर्यवंशी, अरूण पाटील, राजकुमार पाटील, शशिकांत माणगावे, सलीम मुल्ला, धनश्री घाटगे, अशोक महिंद, सुरेश खारकांडे, अजितराव पाटील, महादेव हेगडे, श्यामगोंडा पाटील, नंदकुमार खराडे, रामचंद्र खोत, अरविंद गावडे,  उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक पटेल, लियाकत हवालदार, जुबेेर पटेल, सर्फराज पटेल, अकबर घुडीमार, रिहान तोदलबाग, फैय्याज अहमद, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे व पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते. आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अरूण खरमाटे यांनी पाठिंबा दिला. 

विनायक शिंदे म्हणाले, राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत दाखल शिक्षक, कर्मचार्‍यांना सन 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू आहे. मात्र दि. 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षक, कर्मचार्‍यांना नवीन अंशदान पेन्शन योजना लागू करून मोठा अन्याय केला आहे. सर्वच शिक्षक, कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी शासनस्तरावर शिक्षक संघाने  पाठपुरावा केला. मात्र आश्‍वासनेच मिळाली आहेत. त्यामुळे  शिक्षकांसह सर्व कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. शासनाने शिक्षक, कर्मचार्‍यांना बेदखल करू नये, अन्यथा मंत्रालयावर धडक मोर्चा निघेल.