Wed, Apr 24, 2019 19:30होमपेज › Sangli › अनागोंदी कारभार; अधिकारी मालक झाले

अनागोंदी कारभार; अधिकारी मालक झाले

Published On: Dec 19 2017 2:05AM | Last Updated: Dec 18 2017 9:02PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

आयुक्‍त सभेला हजर रहात नाहीत. महापौर-आयुक्‍त यांच्या भांडणामुळे अधिकार्‍यांनीही महासभेला दांड्या मारल्या.  बांधकाम, आरोग्य विभागासह कोणत्या विभागाची कामे होत नाहीत. अधिकारी मालक झालेत का,  महासभा अस्तित्वात असून उपयोग काय, असे संतप्त सवाल सदस्यांनी सोमवारी महासभेत केला. ठरावाची अंमलबाजवणी व कामे होणार की नाही, असा सवाल सदस्यांनी केला.  

अखेर महापौर हारुण शिकलगार व प्रभारी आयुक्‍त सुनील पवार यांनी दररोज सर्वच अधिकार्‍यांसमवेत काम करून फाईल मार्गी लावण्याचे आदेश दिले. यासाठी सांगली, मिरजेचे उपायुक्‍त, सहाय्यक आयुक्‍त, अन्य विभागातील तज्ज्ञ कर्मचारी दररोज चार-पाच तास एकत्र बसून निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या प्रश्‍नावरही बुधवारी दुपारी बैठक घेण्याचे आदेश दिले.

आयुक्‍तांसाठी मागील सभा तहकूब केली होती. आजही आयुक्‍तांसह अनेक अधिकारी गैरहजर होते. युवराज गायकवाड, संजय मेंढे म्हणाले, अधिकारीच नसतील तर सभा कशासाठी?  आवटी म्हणाले, बांधकाम, आरोग्यसह महत्त्वपूर्ण विषय आहेत. सभा तहकूब करा.

जगन्नाथ ठोकळे म्हणाले, आयुक्‍त न आल्यास किती सभा तहकूब करणार? ठरावांची प्रशासन अंमलबजावणीही करीत नाही. त्याचे काय? 

उपायुक्त पवार  म्हणाले, कायद्यानुसार आयुक्‍तांना सभेला उपस्थित राहणे कायद्याने बंधनकारक नाही. महासभेने ठराव केले तरी ते कायद्याने सुसंगत आहेत का ते तपासून तसेच मनपाची आर्थिक स्थिती पाहूनच त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आयुक्‍त घेतात. प्रलंबित कामांबद्दलही नुकतीच जिल्हाधिकार्‍यांकडे बैठक झाली. त्यानुसार कामांची लवकरच अंमलबजावणी होणार आहे.

या उत्तरावर किशोर जामदार संतप्त झाले. ते म्हणाले, ती बैठक कायदेशीर होती का? आम्हाला त्याचे काय सांगता? संजय मेंढे म्हणाले, काँग्रेसनेत्या जयश्री पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी बैठक घेतली. त्यावेळीही बांधकाम विभागात माणसे भरू, तात्काळ कामी मार्गी लावू, असे आश्‍वासन दिले. पण अद्याप माणसेही नाहीत, कामेही होत नाहीत.  शहर अभियंत्यांची बदली झाल्यानेच ते सभांना हजर रहात नाहीत. 

मैनुद्दीन बागवान म्हणाले, लाख-दोन लाखांच्या निविदा जादा दराने आल्यास त्या अडविल्या जातात. मग मिरजेच्या पाणी योजनेची अमृत योजनेची 103 कोटींची निविदा 8.5 टक्के जादा दराने दोन निविदा असताना कशी दिली? महापौर शिकलगार जामदार म्हणाले, अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे व क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याचे कामही विशिष्ट ठेकेदार करतात. पण मनपाच्या डिपॉझिट, अटींमुळे ते निविदा भरत नाहीत. ते काम विनानिविदा करायला आयुक्‍त तयार नाहीत. 

गौतम पवार म्हणाले, आयुक्‍त अनेक फाईलींवर शेरे मारून कामे अडवितात. त्याचीही तपासणी करायला समिती नेमायला हवी. विष्णू माने म्हणाले, 24 कोटी रुपयांची कामे का थांबली आहेत? सुनील पवार म्हणाले, 24 कोटी रुपयांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केले असून 8 कोटी मंजूर झाली, त्याचे 70 टक्के हिश्श्याने 3.59 कोटी आले. उर्वरित पैशांसाठी मागणी केली आहे. ते न आल्यास मनपा  निधीतून कामे करू. यावर जामदार म्हणाले, स्थानिक कामे निधी नाही म्हणून अडवता, मग यासाठी कोठून निधी आणणार?