Fri, Mar 22, 2019 07:42होमपेज › Sangli › पदाधिकारी निवडीसाठी सर्वपक्षीय रस्सीखेच

पदाधिकारी निवडीसाठी सर्वपक्षीय रस्सीखेच

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 06 2018 11:03PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निकालानुसार भाजप सत्तेत, तर काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधी पक्षाच्या बाकावर बसले आहेत. त्यानुसार आता महापौर, सत्ताधारी गटनेते, विरोधी पक्षनेते तसेच राष्ट्रवादीच्या गटनेतेपदासाठी आता इच्छुकांची रस्सीखेच सुरू झाली आहे. महापौर, गटनेते निवडीसाठी भाजपची बुधवारी (दि. 8) बैठक होणार आहे. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत यावर खल होईल. काँग्रेस-राष्ट्रवादीकडूनही हालचाली गतिमान झाल्या आहेत.

ओबीसी महिला आरक्षण असल्याने महापौरपदासाठी अनुभवी सौ. संगीता खोत, अनारकली कुरणे, तर नव्याने निवडून आलेल्या गीता सुतार, सविता मदने, कल्पना कोळेकर, उर्मिला बेलवलकर, अस्मिता सरगर, नसिमा नाईक यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये मनपातीलअनुभव की पक्षातील सिनियारिटी यात कोणाचे पारडे जड ठरवून कोअर कमिटी आणि  नेते फैसला करणार आहेत. बुधवारी याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. गटनेतेपदासाठीही भाजपकडून लक्ष्मण नवलाई, पांडुरंग कोरे यांची नावे चर्चेत आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी मदनभाऊ पाटील निष्ठावंत उत्तम साखळकर, संतोष पाटील, संजय मेंढे यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये आगामी सांगली विधानसभा निवडणूक काँग्रेससाठी सोपी व्हावी हे लक्षात घेता उत्तम साखळकर किंवा संतोष पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादीच्या गटनेतेपदासाठी विष्णु माने, मैनुद्दीन बागवान, शेडजी मोहिते, दिग्विजय सूर्यवंशी यांना संधी मिळू शकते. त्यादृष्टीनेही खल सुरू आहे काँगे्रेस-राष्ट्रवादीकडून याबाबत चर्चा सुरू आहे. यामध्ये राष्ट्रवादीकडून एकमुखी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील निर्णय घेणार आहेत. पण काँग्रेसमधून नेते आमदार डॉ. विश्‍वजित कदम, माजी मंत्री प्रतिक पाटील शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेसनेत्या जयश्री पाटील, युवानेते विशाल पाटील यांच्यात चर्चा होऊन एकमत होणे गरजेचे आहे. सर्वांचे स्वतंत्र गट आणि त्यानुसार प्रत्येकाची आपापल्या गटाचे वर्चस्व ठेवण्यासाठी नावासाठी रस्सीखेच होणार आहे. 

महापौर निवडीसोबतच उपमहापौर निवडीवर खल होणार आहे. यामध्ये निरंजन आवटी, धीरज सूर्यवंशी, सुब्राव मद्रासी, प्रकाश ढंग आदींची वर्णी लागू शकते. त्यानंतर स्थायी समिती सभापतीपदासाठी प्रामुख्याने अनुभवी युवराज बावडेकर यांच्या नावावर चर्चा आहे.