Mon, Jun 17, 2019 15:23होमपेज › Sangli › रुग्णांची सरकारी दवाखान्याकडे पाठच

रुग्णांची सरकारी दवाखान्याकडे पाठच

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 07 2018 8:33PM इस्लामपूर : मारूती पाटील

अनेक अत्याधुनिक सुविधा, मोफत औषध पुरवठा करून देखील वाळवा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे येणार्‍या रुग्णांची  संख्या खासगी रुग्णालयांच्या प्रमाणात फारच कमी आहे. त्यातच वैद्यकीय अधिकार्‍यांसह आरोग्य विभागातील 66 पदे रिक्‍त आहेत.

वाळवा तालुक्यात  11 प्राथमिक आरोग्य केंद्रे तर 51 उपकेंद्रे व 5 आयुर्वेदिक दवाखाने आहेत. यामध्ये   22 वैद्यकीय अधिकारी, 14 आरोग्य सहाय्यक, 11 आरोग्य सहाय्यिका, 52 आरोग्य सेवक, 65 आरोग्य सेविका, 12 औषध निर्माता, 11 वाहनचालक, 11 कनिष्ठ सहाय्यक, 60 परिचर, 5 आयुर्वेदिक वैद्य असा सुमारे 264 जणांचा स्टाफ मंजूर आहे. यामध्ये तालुक्यात वैद्यकीय अधिकारी-2, आरोग्य सहाय्यिका-4, आरोग्य सहाय्यक-21, आरोग्य सेविका-2, वाहन चालक-8, परिचर-27, आर्युवेदिक वैद्य-2  अशी 66 पदे रिक्‍त आहेत. 

11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना स्वतःच्या इमारती आहेत. तर 51 पैकी 2 ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने उपकेंद्रास इमारती नाहीत. याशिवाय इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालय व आष्टा येथील आरोग्य केंद्रातही चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत.

शासनाच्या विविध योजनांतून वर्षाला लाखो रुपयांचा निधी आरोग्य विभागाला मिळत आहे. गतवर्षी तालुक्यात विविध शासकीय योजनांसाठी 42 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. परंतु या निधीचा कागदोपत्री मेळ घातला जात आहे. खर्‍या लाभार्थ्यांपर्यंत निधी पोहोचत नसल्याच्या तक्रारी आहेत. 

एकीकडे खासगी रुग्णालयात रुग्णांना लुबाडले जात असताना दुसरीकडे शासकीय रुग्णालयातून अत्याधुनिक सुविधा, मोफत उपचार व औषध पुरवठा होत असतानाही तसेच अनेक वैद्यकीय अधिकारी प्रामाणिकपणे काम करून रुग्णांना चांगल्या सुविधा देत आहेत. तरीही रुग्ण तिकडे पाठ फिरवत आहेत.