Wed, Nov 14, 2018 10:03होमपेज › Sangli › ...आता मुलींना शेतकरी नवराच हवा

...आता मुलींना शेतकरी नवराच हवा

Published On: Apr 08 2018 2:16AM | Last Updated: Apr 07 2018 11:26PMसांगली : गणेश कांबळे

मुलींचा कमी जननदर, त्यांचे उच्च शिक्षणाचे वाढलेले प्रमाण, लग्नासाठी नोकरदार मुलगा हवा, ही पालकांची मानसिकता यामुळे उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही केवळ ‘शेतकरी’ असल्यामुळे अनेक मुले लग्नापासून वंचित राहिलेली आहेत.  ही अवस्था सर्वच समाजात  आहे. यातून सामाजिक स्वास्थ्य बिघडत  आहे. यातूनच मलिकवाड येथे पहिला ‘जैन शेतकरी वधू-वर मेळावा’ होत आहे.  

वीर सेवा दलाचे कार्यवाह शशिकांत राजोबा, मुख्य संघटक एन. जे. पाटील व दिगंबर जैन बोर्डिंगचे राहुल चौगुले म्हणाले,  पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांनी असी (युद्ध), मसी (लेखन), कृषी (शेती) हे संस्कार दिले. त्यामुळे जैन समाज शेतीकडे वळला. कालांतराने जशी कुटुंबांची संख्या वाढत गेली, तसे जमिनीचे तुकडे होत गेले.  शेकडो एकर असणारी शेती आता दोन ते तीन एकरावर आली आहे. तरीही शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत असतो.

जैन समाजात  मुलेही उच्चशिक्षित, आधुनिक पद्धतीने शेती करीत आहेत. बेदाणा, ऊस, द्राक्षे  पिके घेऊन लाखो रुपयांचे उत्पन्न ते मिळवित असतात. असे असले तरी जैन समाजातीलच नव्हे, तर उच्चशिक्षित मुलींची अपेक्षा मात्र लाखो रुपये मिळविणारा शेतकरी नवरा नको, तर नोकरदार नवरा हवा, अशीच आहे. 

जैन शेतकरी वधू-वर मेळावा

समाजातील शेतकरी मुलांच्या लग्नाचा प्रश्‍न गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर शनिग्रह अरिष्ठ निवारक मूलनायक श्री 1008 मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर मलिकवाड येथे डॉ. रावसाहेब कन्नुरे यांनी जमीन दिली. त्यावर मंदिर उभे केले. या ठिकाणी  वीरसेवा दलाच्या प्रयत्नातून रविवार, दि. 8 एप्रिलरोजी पहिले जैन शेतकरी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पदवीधर, शेतकरी मुलांशीच लग्न करणार, या अटीवर या ठिकाणी सध्या 300 मुलींची नोंदणी झालेली आहे. तर 700 मुलांनी नोंदणी केली आहे.  या मेळाव्यास पाच हजार समाज बांधव एकत्रित येणार आहेत.  

एका गावातून 4 मुलींची नोंद केल्यास त्यांचा सन्मान केला जाणार आहे. 8 पेक्षा जास्त मुलींची नोंद झाल्यास त्यांना प्रवास खर्च दिला जाणार आहे. गरीब, अनाथ, अपंग मुले, मुली असल्यास त्यांचा लग्नाचा खर्च संयोजन समितीच्यावतीने केला जाणार आहे. यासाठी अभय करूले, बाळासाहेब पाटील, अजित भंडे हे प्रयत्न करीत आहेत. बिघडणारे समाजस्वाथ्य टिकविण्याचे काम करण्याचे सकारात्मक पाऊल जैन समाजाने उचलले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास सर्व समाजाला तो एक स्फूर्तीदायी ठरणार आहे.

 

Tags : sangli, sangli news, Wedding, farmer, husband,