Fri, Jul 19, 2019 07:43होमपेज › Sangli › मनपा सत्तेला भ्रष्टाचाराचा डाग लावू नका

मनपा सत्तेला भ्रष्टाचाराचा डाग लावू नका

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 08 2018 10:45PMसांगली : प्रतिनिधी

भाजपच्या कमळ चिन्हावर नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून आला आहात. त्यानुसार  विकासाचा आणि पारदर्शी कारभार करा.  सत्तेला  भ्रष्टाचाराचा डाग लागू देऊ नका, अशा सूचना  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नूतन नगरसेवकांना बुधवारी दिला. येथील खरे मंगल कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी नगरसेवकांना आदर्श कामकाजपद्धतीबाबत मार्गदर्शन केले. त्या बैठकीत ना. पाटील बोलत होते.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, संघाचे जिल्हा संघटन मंत्री विवेक चौथाई, रमेश कोटीभास्कर, भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक रघुनाथ कुलकर्णी, माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, दीपक शिंदे, मुन्ना कुरणे आदी उपस्थित होते.

ना. पाटील नगरसेवकांना म्हणाले, देशातील सर्वाधिक मोठ्या अशा भाजप या राष्ट्रीय पक्षाचे तुम्ही सदस्य झाला आहात. नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून येण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी ताकद तुमच्या प्रभागांमध्ये राबत होती. भाजपचे अन्य विभाग आणि संघटनांनी तुम्हाला विजयापर्यंत नेऊन पोहोचविले आहे, हे विसरू नका. त्यामुळे त्यांच्याकडून जनतेच्या कामांबाबत काही सूचना आल्या; तर त्यांचा विचार करून तत्काळ कामे करा.

ते म्हणाले, आपण नगराचे, प्रभागाचे मालक नव्हे, सेवक आहोत हे नगरसेवकांनी  लक्षात ठेवावे. यापूर्वी ज्या पद्धतीने महापालिकेत बेशिस्त कारभार चालत असे तसा यापुढे चालणार नाही. जनतेने आपल्याला विश्‍वासाने विकासासाठी पर्याय म्हणून निवडले आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्याने  प्रभागातील नागरिकांच्या समस्या, विकासाच्या अपेक्षा लक्षात घ्याव्यात. त्यासाठी स्वत:ची प्रभागातील कार्यालये ऑनलाईन सुसज्ज ठेवा. महापालिकेवर  विसंबून न राहतात किरकोळ कामांसाठी स्वत:ची यंत्रणाही पगारावर कार्यरत ठेवा. कामे झाली तरच जनता तुम्हाला पुन्हा संधी देईल.ना. पाटील म्हणाले, विकासासाठी शासनाकडून कुठेही निधी कमी पडणार नाही. प्रत्येक प्रभागात सर्वांना पुरेसा विकासासाठी निधी आणि संधी मिळेल. त्यात कुठे काही कमी-जास्त असेल तर थेट माझ्याशीही संपर्क साधा.

ते म्हणाले, प्रत्येक नगरसेवकाने  सक्षमपणे काम केले पाहिजे, दुसर्‍यावर विसंबून राहता कामा नये. महिला सदस्यांनी स्वत: काम केले पाहिजे. दुसरे कारभारी नेमून काम करू नये. यासाठी प्रशासन, गटनेते, महापौरांशी तसेच अनुभवी नगरसेवकांशी चर्चा करा. पाच वर्षांत शंभर टक्के पारदर्शी विकास झाला पाहिजे, ही जनतेशी आपली कमिटमेंट राहील. यावेळी श्री. गाडगीळ, खाडे, श्री. चौथाई आदींनी मार्गदर्शन केले. 

पदांच्या संधी प्रत्येकाला किमान दोन वर्षे मिळतील

ना. पाटील म्हणाले, पदांसाठी कोणीही वशिलेबाजी, आग्रह, पाठपुरावा असले प्रकार करू नयेत. सत्ता शंभर टक्के भाजपची आहे. त्यामुळे महापालिकेतील सर्वच विभागांची पदे प्रत्येक सदस्याला पाच वर्षांत किमान दोन वर्षे तरी मिळणार हे स्पष्ट आहे. त्यात काहीजणांना आधी, तर काहीजणांना नंतर मिळतील. पण त्याने नाराज न होता पक्षावर निष्ठा ठेवून काम करीत रहा. प्रत्येकावर पक्षाच्या कोअर कमिटीची नजर राहील. तुमच्या कामाचे प्रगतीपुस्तकही राहील हे लक्षात ठेवा.