Mon, Nov 19, 2018 06:18होमपेज › Sangli › चाळीस जणांना तडीपार करणार : पोलिस अधीक्षक

चाळीस जणांना तडीपार करणार : पोलिस अधीक्षक

Published On: Jun 27 2018 1:22AM | Last Updated: Jun 27 2018 12:26AMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाने बंदोबस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाईची सर्व तयारी केली आहे. सहा टोळ्यांतील 40 गुन्हेगारांना तडीपार करण्याचे प्रस्ताव तयार केले आहेत. अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी मंगळवारी पत्रकारांना  दिली. 

ते म्हणाले, जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहील, यासाठी पोलिस नेहमीच खबरदारी घेत आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आमची तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. महापालिका क्षेत्रात निवडणूक काळात  गुन्हे करणार्‍यांचे रेकार्ड तपासण्यात येत आहे. त्यानुसार संघटित टोळी करून गुन्हे करणार्‍या सहा टोळ्यांतील 40 जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. लवकरच तो मंजूर होऊन त्यांच्यावर कारवाई होईल. त्या शिवाय अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नेहमी किरकोळ गुन्हे करणारे आणि सराईत गुन्हेगारांचीही माहिती घेण्यात येत आहे. 

ते म्हणाले, महापालिका क्षेत्रातील संवेदनशील प्रभाग आणि त्यातील भाग निश्‍चित करण्यात येत आहेत. सर्वच गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच असणार आहे. रात्रीच्या गस्तीसाठी पोलिसांना शहरातील पॉईंट निश्‍चित करुन देण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. त्यामुळे कोणी गडबड , गोंधळ  करण्याचा प्रयत्न केल्यास सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल. 

ते म्हणाले, निवडणूक काळात बेकायदा डिजिटल पोस्टर लावता येणार नाहीत. कोणतेही पोस्टर महापालिकेची परवानगी घेतल्यानंतरच लावता येईल.  पोस्टर तयार करणार्‍यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. कोठेही अनुचित प्रकार दिसून आल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा. त्याची दखल तातडीने घेण्यात येईल.