Tue, Apr 23, 2019 20:26होमपेज › Sangli › जुन्यांना द्या ‘डच्चू’; नव्यांना हवी ‘संधी’

जुन्यांना द्या ‘डच्चू’; नव्यांना हवी ‘संधी’

Published On: May 24 2018 1:22AM | Last Updated: May 23 2018 7:35PMसांगली : मोहन यादव 

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा जुन्या  चेहर्‍यांना  उमेदवारी  मिळण्याची शक्यता आहे. पण याच नगरसेवकांनी गेल्या 20 वर्षांत तीनही शहरांचा पार विचका करुन टाकला आहे. विकास कामांचा केवळ कागदोपत्री मेळ घालून स्वत:च्या तुंबड्या भरण्याचा ‘उद्योग’ यांनी केला आहे. याचा जनतेत तीव्र संताप व नाराजी आहे. त्यामुळे आता सर्व पक्षांनी आता जुन्यांना ‘डच्चू’ व नव्यांना ‘संधी’ देण्याची वेळ आली आहे. 

सांगली महापालिकेच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. सर्वच पक्षांकडे इच्छुकांची भाऊगर्दी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी बहुतांश जुनेच चेहरे आहेत. येथे उमेदवारी उमेदवारी  नाकारल्यास भाजप अथवा दुसर्‍या पक्षात उडी मारण्याची अनेकांची तयारी सुरु आहे. ‘सर्व डाळ आपल्याच भातावर हवी’ या भावनेतून मातब्बर बनलेल्यांनी हे डावपेच खेळण्यास सुरुवात केली आहे. पण  गेल्या 20 वर्षांत या बड्यांनी तीनही शहरे विकसित करण्याऐवजी भकासच केली आहेत. रस्ते, आरोग्य, ड्रेनेज, पाणी अशा पायाभूत सुविधा देण्यात सर्वच पक्ष, पदाधिकारी व नगरसेवक अपयशी ठरले आहेत.  अतिक्रमणे, कचरा, सुरळीत पाणीपुरवठा असे महत्वाचे प्रश्‍न गेल्या अनेक वर्षांत कोणतेच नगरसेवक सोडवू  शकले नाहीत. सभेत टक्केवारीसाठी गोंधळ घालण्यात अनेकजण धन्यता मानत आहेत. केवळ  घंटागाडी का आली नाही, यासाठी फोन करणे आणि वॉर्डात बसायला बाकडी देणे इतकीच सामान्यांनाची सेवा या पामरांनी केली आहे. 

अनेकजण गेली 15-20 वर्षे ठाण मांडून बसले आहेत. पहिल्या पाच वर्षात नवखा असणारा  ‘सेवक’ पुढील पाच वर्षात ठेकेदार बनल्याची अनेक उदाहरणे आहेत. तिसर्‍या टर्ममध्ये तर नगरसेवक पदाधिकारी बनून घोटाळे करण्यात तरबेज होतो. विकास कामे व निधीचा खर्च केवळ कागदोपत्री दाखवून  केवळ स्व विकास करण्यात सर्वजण  मग्न  आहेत. काही मोजके अपवाद वगळता अनेकांच्या संपत्तीत वेगाने वाढ झाली आहे. दुचाकीवरुन फिरणारे चारचाकीत तर फ्लॅटमध्ये राहणारे बंगल्यात गेले आहेत. पदाधिकारी बनलेल्यांनी मोठी ‘हातसफाई’ करुन प्रचंड ‘माया’ जमविली आहे. मोठी  पदे भूषविणार्‍या अनेकांची संपत्ती डोळे दिपविणारी आहे. याच मुरब्बी व मातब्बरांना पदाचा मोह सुटता सुटेना झाला आहे. काहीही झाले तरी जनतेच्या ‘सेवे’चे नाटक करुन ‘मेवा’ खाण्याचा जन्मसिध्द हक्क आपल्यालाच आहे, या अविभार्वात ते वावरत आहेत. सर्वच कामांत यांना ‘टक्केवारी’चे ‘अमृत’ पिल्याशिवाय राहवत नाही. सत्तेत राहण्यासाठी ‘सर्व काही’ करण्याची त्यांची तयारी आहे. ‘सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून पुन्हा सत्ता’ असा फॉर्म्युला सांगलीतील नगरसेवकांनी तयार केला आहे. सत्तेसाठी वाट्टेल ते करणारा ‘मिरज पॅटर्न’ तर अवघ्या महाराष्ट्रात गाजत आहे. पण याचे तसूभरही वाईट या नगरसेवकांना वाटत नाही. ‘बदनाम हुआ तो क्या हुआ, नाम तो हुआ और पैसाभी मिला’ अशी वृत्ती बोकाळली आहे. यामुळेच यांना गब्बरांना पुन्हा-पुन्हा जनतेची सेवा करुन मेवा खाण्याची इच्छा  होत आहे. 

परंतु यातून शहराची पुरती  वाट लागणार आहे. वीस वर्षांचा इतिहास  पुन्हा मागील पानावरुन तसेच पुढे सरकणार आहे. सामान्य जनतेत महापालिकेच्या या सत्तालोलूप कारभार्‍यांविषयी प्रचंड चीड व तीव्र संताप आहे. त्यामुळे आता यांना घरी बसवावे, अशी जनतेची अपेक्षा आहे. त्यामुळेच नव्यांना संधी द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे. तसेच एका पक्षाने उमेदवारी नाकारल्यास इतर पक्षांकडे धाव घेणार्‍यांना कोणीही प्रवेश देवू नये. अथवा त्याची योग्य तपासणी करूनच प्रवेश  द्यावा, असे सामान्यांना वाटत आहे. आपल्यात आला म्हणजे ‘पवित्र’ झाला, अशी सत्तेसाठी सोयीची  भूमिका आता  बंद करण्याची  वेळ आली आहे. कारण ‘हे पब्लिक सब जानती है.’ ‘फ्री पास’च्या नावाखाली  कोणालाही पायघड्या घालण्याचा प्रकार  थांबविल्यास  महापालिका लुटणार्‍यांना अटकाव बसेलच, पण निष्ठावंतही नाराज होणार  नाहीत. सर्वच पक्षांनी नवीन चेहरा व 35  वर्षांच्या आतील उमेदवार द्यावा, असेही बहुतेकांना वाटत आहे. एक नवीन पायंडा सुरू  करण्याची सर्वच पक्षांना यानिमित्ताने नामी संधी आहे. जो  पक्ष या  जनभावनेची गंभीर  दखल घेवून नव्यांना संधी देईल, त्याचे सत्तेत येण्याचे स्वप्न साकारू शकते. 

कामराज योजना राबविण्याची गरज

पंडित नेहरू यांनी  काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांना राजकारणातून सक्तीने निवृत्त करुन नव्यांना संधी  देण्यासाठी कामराज योजना आणली होती. यातून अनेक  नेत्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देवून पक्ष कार्याला वाहून घेतले होते. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही असाच फॉर्म्युला वापरला आहे. त्यांनी पक्षात व राजकारणात नव्या चेहर्‍यांना संधी देवून सत्तेचे स्वप्न साकार करण्याचा पराक्रम केला आहे. सांगली महापालिकेतही  सर्व पक्षांनी अशीच कामराज योजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याशिवाय  नव्या चेहर्‍यांना संधी मिळणार नाही अन् शहरातही सुधारणा होणार नाहीत.  

आजी-माजी महापौर, सभापतींनी नव्यांना संधी द्यावी

गेली दहा-पंधरा वर्षे  नगरसेवक असणारे तसेच  आजी-माजी महापौर व समिती  सभापती  यांनी मनपातील सर्वोच्च पदे भूषविली आहेत. मात्र आता हेही उभा राहण्यास इच्छुक आहेत.  या मोठ्या पदाधिकार्‍यास  अथवा त्यांच्या वारसदारास  अजिबात उमेदवारी देवू नये, अशी सामान्य जनतेची इच्छा आहे. सर्वोच्च पदाचा कारभार पाहिलेल्यांना  नगरसेवक होणे निश्‍चितच शोभादायक नाही. यांनी नव्या चेहर्‍यांना संधी देवून  मार्गदर्शकाची भूमिका बजावावी, असे सामाजिक, राजकीय क्षेत्रातील  जाणकारांचे मत आहे.