Sat, Nov 17, 2018 17:01होमपेज › Sangli › आगामी निवडणुकीत केंद्रात तिसरी आघाडी सत्तेवर येईल

आगामी निवडणुकीत केंद्रात तिसरी आघाडी सत्तेवर येईल

Published On: Feb 10 2018 1:36AM | Last Updated: Feb 09 2018 10:53PMसांगली : प्रतिनिधी

काँग्रेस आघाडी सरकारने भ्रष्टाचार केल्यानेच जनतेने भाजपकडे सत्ता सोपविली. मात्र, भाजप सरकारने आश्‍वासनांची पूर्तता केली नाही. त्यांनी जनतेच्या डोळ्यात केवळ धूळच फेकली. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपसह काँग्रेसही सत्तेबाहेर राहील. तिसर्‍या आघाडीचे सरकार सत्तेत येईल. यामुळे शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात, असे प्रतिपादन पत्रकार निखील वागळे यांनी केले. 
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य व्ही. वाय. पाटील होते. 

वागळे म्हणाले, काँग्रेसमध्ये घराणेशाही असल्याचा आरोप भाजपकडून केला जातो. मात्र भाजपच्या कितीतरी नेत्यांच्या मुलांना विधानसभा आणि लोकसभेत प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. भाजपचेही काँग्रेसीकरण झाले आहे. तो पक्ष भारतीय होर्डिंग पार्टी झाला आहे. काँग्रेसने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला म्हणून जनतेने त्यांना सत्तेवरून पायउतार केले. भाजपला सत्ता दिली पण त्यांच्याकडून भ्रमनिरास झाला.

सध्याच्या केंद्र आणि राज्यातील शासनामुळे फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार धोक्यात आला आहे. देशाच्या संविधानाला सत्ताकारणातून धोका निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या केंद्रीय अंदाजपत्रकात शेतकर्‍यांना हमीभाव पन्नास टक्के वाढवून दिल्याचे सांगितले गेले. प्रत्यक्षात मात्र उत्पादन खर्चच कमी दाखवून हमीभाव दिला आहे. त्यामुळे स्वामिनाथन आयोगाची शिफारस या सरकारने स्वीकारलीच नसल्याचे दिसून येते. गेल्या चार वर्षांत देशातील मध्यमवर्ग, उद्योजक, शेतकरी, महिला नाराज आहेत. मग अच्छे दिन कोणाचे आले, असा प्रश्‍नही वागळे यांनी यावेळी उपस्थित केला.