Mon, Aug 19, 2019 17:33होमपेज › Sangli › शासकीय कर्मचार्‍यांचा दुसर्‍या दिवशी ठिय्या

शासकीय कर्मचार्‍यांचा दुसर्‍या दिवशी ठिय्या

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 08 2018 8:45PMसांगली : प्रतिनिधी

सातवा वेतन आयोग लागू करावा, जुनी पेन्शन योजना लागू करा आदी विविध मागण्यांसाठी  सरकारी, निमसरकारी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाला दुसर्‍या दिवशीही चांगला प्रतिसाद मिळाला. कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, जिल्ह्यातील विविध संघटना, शिक्षक संघटनांनीही आंदोलनात सहभाग घेत पाठिंबा दिला. जिल्ह्यातील कर्मचारी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्यामुळे संपूर्ण कामकाज ठप्प झालेआहे. 

सातवा वेतन आयोग, अंशदायी पेन्शन योजना , 5 दिवसाचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय विनाअट 60 वर्षे करा, महिला कर्मचार्‍यांना बालसंगोपन रजा दोन वर्षांची  करावी, अनुकंपा  भरती प्रक्रिया विनाअट रद्द करावी. सेवानिवृत्त चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या एका वारसाला  पूर्वीप्रमाणे शासन सेवेत नियुक्‍ती करावी, महागाई भत्त्यांची थकबाकी मिळावी आदींसह विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचार्‍यांनी राज्यात तीन दिवसांचा संप पुकारला आहे. 

दरम्यान, बुधवारी दुसर्‍या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटना, शिक्षक समिती, राज्य महासंघ, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, सर्व महसूल संघटना, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, सिव्हिल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज आदी ठिकाणचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी बोलताना कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस पी. एन. काळे म्हणाले, आमच्या विविध मागण्यांसाठी धरणे, मोेर्चे आंदोलन करीत आहोत. शेवटचा पर्याय म्हणून आम्ही संप करत आहोत. परंतु सरकार आम्हाला आश्‍वासनाशिवाय काहीही देत नाही. जर मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही यापुढेही तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनीदिला.

यावेळी कार्याध्यक्ष डी. जी. मुलाणी, उपाध्यक्ष शरद पाटील, चतुर्थश्रेणी संघटनेचे संजय व्हनमाने, संजय सडकर, गणेश धुमाळ, सुरेंद्र पेंडुरकर, शिक्षक संघटनेचे किरण पाटील, बाबासाहेब लाड, सयाजी पाटील आदीसह विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कामावर हजर असणार्‍यांना बांगड्यांचा आहेर

सातवा वेतन आयोग, पेन्शन योजना लागू करावी आदी विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचार्‍यांनी तीन दिवसाचा संप पुकाराला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केेले आहे. सर्व कर्मचार्‍यांनी या संपात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात काही कर्मचारी कामावर हजर होते. त्यामुळे कर्मचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात जावून संपात सहभागी व्हा, अन्यथा बांगड्या भरा, असे म्हणून त्यांच्या टेबलावर बांगल्या ठेवून कर्मचार्‍यांचा निषेध केला.