Sun, Mar 24, 2019 12:50होमपेज › Sangli › वृत्तपत्र विक्रेत्यांची सांगलीत निदर्शने 

वृत्तपत्र विक्रेत्यांची सांगलीत निदर्शने 

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 11:18PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

वृत्तपत्र  विक्रेत्यांसाठी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ व्हावेे, वृत्तपत्र विक्रेत्यांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.  

या आंदोलनात मोठ्या संख्येने विक्रेते सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 10 रूपयांची नाणी बँका स्वीकारत नसल्याबाबत तक्रारही यावेळी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विकेता संघटना गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक  वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्यांसाठी लढा देत आहे.   संघटनेच्या शिष्टमंडळासोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत  बैठक झाली. त्यावेळी कामगार मंत्री संभाजी पाटील -निलंगेकर यांनी दि. 15 ऑगस्ट 2017 पर्यंत वृत्तपत्र विकेता कल्याणकारी मंडळाची घोषणा करू असे आश्वासन दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. 

स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करा, त्याच्या माध्यमातून विविध योजना राबवाव्यात, गावात, शहरात मोक्याच्या ठिकाणी वृत्तपत्र विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, शासकीय घरकुल योजनेत   राखीव घरे ठेवावीत, राज्य संघटनेचे सदस्य, पदाधिकार्‍यांना तसेच जेष्ठ वृत्तपत्र विकेत्यांना एस.टी. प्रवासाची मोफत सोय मिळावी, संघटित कामगार वर्गातून एक प्रतिनिधी विधानसभेवर घेण्यात यावा.

जिल्हाधिकारी पाटील यांनी   विक्रेत्यांची  बाजू ऐकून घेतली.  हे निवेदन तात्काळ   कामगार सचिव यांच्याकडे पाठवले. त्याशिवाय 10 रूपयांची नाणी स्विकारण्याबाबत रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचे पालन करण्याबाबत बँकांना सुचना देण्याचे आश्वासन दिले. 

यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, राज्य संघटना संचालक मारुती नवलाई, जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, जिल्हा संघटक सचिन चोपडे, जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी काकडे, जिल्हा सरचिटणीस विशाल रासनकर, शहराध्यक्ष नंदू पोवाडे मिरज, देवानंद वसगडे, कुपवाड, उपाध्यक्ष कृष्णा जामदार, सांगली यांच्यासह  पदाधिकारी  आणि वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.