Tue, Apr 23, 2019 13:35होमपेज › Sangli › ‘समाजकल्याण’कडेही मराठा उमेदवारांची उपेक्षा

‘समाजकल्याण’कडेही मराठा उमेदवारांची उपेक्षा

Published On: Dec 17 2017 2:13AM | Last Updated: Dec 16 2017 10:36PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण  कार्यालयाकडे नोव्हेंबर 2014 मध्ये परिचर पदाच्या सरळसेवा भरतीसाठी परीक्षा झाली होती. मराठा आरक्षणासाठी तीन जागा होत्या. आरक्षणाला स्थगिती आल्याने नेमणूक आदेश दिले नाहीत. मात्र शासनाने शुध्दिपत्रक काढल्याने मराठा उमेदवारांना दिलासा मिळाला. पण त्यावरील मार्गदर्शनाचा प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडून राहिला आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत दोन वर्षे गेली तरिही या उमेदवारांची उपेक्षा संपेना. 

शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग याअंतर्गत राज्य शासनाने मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत 16 टक्के आरक्षण सुरू केले. शासनाने त्यासंदर्भात दि. 9 जुलै 2014 रोजी अध्यादेश काढला. त्यानुसार दि. 15 जुलै रोजी शासन निर्णयही जारी झाला. सांगलीत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाकडील परिचर भरतीसाठी मराठा आरक्षणातील तीन जागा होत्या. दि. 9 नोव्हेंबर 2014 रोजी लेखी परीक्षा झाली. त्याच दिवशी निकालही जाहीर झाला. निवड यादी, प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झाली. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर नियुक्ती देणे एवढेच बाकी होते. मात्र दि. 14 नोव्हेंबर 2014 रोजी मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे मराठा उमेदवारांची नियुक्ती रोखून धरण्यात आली. 

दरम्यान, शासनाने दि. 2 डिसेंबर 2015 रोजी शुद्धीपत्रक काढून मराठा आरक्षणातील निवड यादीतील उमेदवारांना तात्पुरत्या स्वरुपात 11 महिन्यांसाठी नियुक्ती आदेश देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार संबंधित उमेदवारांनी समाजकल्याण कार्यालयाकडे हेलपाटे मारणे सुरू केले. 

दि. 10 मार्च 2016 पासून तीनवेळा निवेदन दिले. शासन शुद्धीपत्रकानुसार नेमणूक आदेश मिळावेत, अशी मागणी केली. त्यावर चार-पाच महिन्यांपूर्वी या कार्यालयाने वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन मागविले. नियुक्तीच्या प्रतीक्षेत उमेदवारांची दोन वर्षे गेली आहेत.