Wed, May 22, 2019 20:17होमपेज › Sangli › नव्या कारभार्‍यांपुढे विकासाचे आव्हान

नव्या कारभार्‍यांपुढे विकासाचे आव्हान

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 07 2018 1:01AMमिरज : जालिंदर हुलवान

मिरजेत आजही अनेक समस्या आहेत. काँग्रेसची सत्ता ही केवळ विकास न झाल्यानेच गेली आहे. आता नव्या कारभार्‍यांनी तरी या समस्या सोडविण्याची गरज आहे. निवडणूक  जवळ आल्यानंतर ज्या पद्धतीने कामांचा धडाका सुरू झाला होता. तसेच काम  आता होण्याची अपेक्षा नागरिक  व्यक्त करीत आहेत. सर्वाधिक जबाबदारी भाजपच्या नगरसेवकांची आहे.

खराब आणि अरूंद रस्ते...

खराब आणि अरूंद रस्ते, ही एक  शहरातील गंभीर समस्या आहे.  बहुतांश रस्ते  गेल्या अनेक वर्षांपासून रूंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. एकीकडे लोकसंख्या आणि वाहनांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.दुसरीकडे दिवसेंदिवस अतिक्रमणामुळे रस्ते अरूंदच होत चालले आहेत. छत्रपती शिवाजी रस्ता, बायसिंगर लायब्ररीपासून एमआयडीसीकडे जाणारा रस्ता, सुखनिवास हॉटेल ते शिवाजी स्टेडीयम, खंडोबा देवालय ते गुरूवार पेठ, रेल्वेस्थानक ते बस स्थानक, दर्गाह रस्ता, हिरा चौक ते शहर पोलिस ठाणे, तहसील कार्याल व कोर्ट रस्ता, सराफ कट्टा ते महाराणा प्रताप चौक, चर्च रस्ता, गांधी चौक ते शिवाजी पुतळा या सर्व रस्त्यांचे तातडीने रूंदीकरण आवश्यक आहे.

औद्योगिक वसाहतीमध्येही खराब रस्ते खराब रस्त्यांचे दुखणं औद्योगिक वसाहतींमध्येही  आहे.  गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहतीमधील सर्व रस्ते  खराब झाले आहेत. त्यामुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रस्ते खराब झाल्याने त्याचा त्रास उद्योजकांना होतो आहेे. 

भटक्या कुत्र्यांचा प्रश्‍न गंभीर...

मोकाट कुत्री, भटकी जनावरे,  माकडांचा उच्छाद यांचीही समस्या आहे.  भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कायमचा आवश्यक आहे. नसबंदी, कायम स्वरूपी डॉग व्हॅन मिरजेसाठी ठेवणे असे उपाय केले पाहिजेत.

लक्ष्मी मार्केटमध्ये संग्रहालय...

शहरातील ऐतिहासिक किल्ल्यासह अनेक वास्तू जतन करण्याची आज गरज  आहे. विविध ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.  लक्ष्मी मार्केटच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रिकाम्या खोल्यांमध्ये संग्रहालय शक्य  आहे. मिरज ही संगीतनगरी असल्याने संगीत क्षेत्रातीलही अनेक ऐतिहासिक वस्तू येथे उपलब्ध आहेत. मिरजेच्या इतिहासाची साक्ष देणारी कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्या  या संग्रहालयात ठेवता येतील. 

दवाखान्याकडे लक्ष आवश्यक

 गरीबांचा आधार  म्हणजे मिरजेतील महापालिकेचा दवाखाना. मात्र येथे डॉक्टर कमी वेळ  उपलब्ध  असतात. त्यामुळे रूग्णांनी या दवाखान्याकडे पाठ फिरवली आहे. येथे आंतररूग्ण विभाग सुरू केला पाहिजे. स्वच्छता नसते. डॉक्टरही वेळेत येत नाहीत. पूर्णवेळ आणि तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याची गरज आहे. सी.टी. स्कॅन मशीनचीही  गरज आहे.  रेबीस लस  फक्त मनपा क्षेत्रातील लोकांनाच दिली जाते. बाहेरून शहरात आलेल्या व्यक्तीला येथे कुत्रे चावले तरी ती लस दिली जात नाही.

भाजी मंडईचा प्रश्‍न 

येथील भाजी मंडईचा प्रश्‍न  अनेक वर्षे जैसे थे  आहे. या प्रश्‍नाचे घोंगडे गेल्या 39 वर्षे  भिजत पडले आहे. एकीकडे प्रशासन रस्त्यावर बसून भाजी विकण्यास मनाई करते आणि दुसरीकडे भाजीमंडईही बांधून देत नाही. त्यामुळे  भाजी विक्रे त्यांचे हाल सुरू आहेत.       

झोपडपट्टी पुनर्वसन बाकी..

 इदगाह नगरजवळ सुमारे 50 वर्षांपूर्वीची संजय गांधीनगर झोपडपट्टी आहे. त्या रहिवाशांचे पुनर्वसन बाकी आहे. इदगाह रस्त्यावर 438 घरांची इमारत  तयार आहे. मात्र काही कामेे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे तेथे सर्वांचे पुनर्वसन झालेले नाही.  अनेक झोपडपट्टीवासीय त्या घरांच्या प्रतीक्षेत आहेत.  

कचरा आणि घाणीचे साम्राज्य..

शहरात कचरा ही मोठी समस्या आहे. शहरात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे. घंटागाड्यांची सोय असूनही त्या  नियमित येत नाहीत. कोपर्‍या-कोपर्‍यावर कचर्‍याचे ढीग साठलेले असतात. ते साफ करण्याची गरज आहे.

अतिक्रमणे, बेकायदा बांधकामे

शहरात बेकायदा बांधकामे  आणि अतिक्रमणांचा सपाटा सुरूच आहे. दररोज वाढत असलेल्या  झोपड्या तसेच  रेल्वे स्थानक, एस.टी. स्थानक  व अन्य ठिकाणी असलेली खोकी व  हातगाड्यांमुळे शहराला  बकाल स्वरूप प्राप्‍त झाले आहे.

मिरजेत उद्याने भकास...

शहरात लहानमोठी अशी 13 उद्याने आहेत. त्यापैकी निम्म्यापेक्षा  अधिक उद्यानांना भकास स्वरूप आले आहे.  मार्केटमधील गांधी उद्यान आता चकाचक होते आहे. तशी सर्व उद्याने चकाचक होण्याची गरज आहे. शहरात 24 पुतळे आहेत. त्यापैकी निम्म्या पुतळ्यांच्या परिसराची दुरवस्था झाली आहे. 

खोक्यांचे शहर ही ओळख पुसण गरजेचे...

खोकी विरहित शहर करण्याच्या मोहिमेत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कारण काढलेल्या खोक्यांचे पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे शहरात जागा दिसली  की टाक खोके, हा प्रकार काही वर्षांपासून सुरू आहे.हे पुन्हा खोक्यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. 

शाळांची दुरवस्था..

जिजामाता विद्यालय व काही अपवाद वगळता महापालिकेच्या अनेक शाळा ह्या विद्यार्थी नसल्याने अक्षरश: ओस पडलेल्या आहेत. शासनाच्या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा असूनही शिक्षणाचा दर्जाच घसरला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळांकडे पाठ फिरविली आहे. गेल्या काही वर्षांत  शहरातील काही शाळा बंद पडल्या आहेत. अनेक शाळा त्या मार्गावर आहेत.  गरीब आणि गरजूंसाठी या शाळा दर्जेदारपणे सुरू राहणे गरजेचे आहे.  फुटबॉल या खेळातही मिरजेचा लौकिक आहे. या खेळाचीही शहरात मोठी परंपरा आहे. फुटबॉलसाठी  छत्रपती शिवाजी क्रीडांगण एकमेव उपलब्ध आहे. मात्र त्या क्रीडांगणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. बालगंधर्व नाट्यमंदिराकडेही दुर्लक्ष आहे.      

उपनगरांमध्ये मरण यातना...

उपनगरांमध्ये नागरिक अक्षरश: मरण यातना सहन  करीत  आहेत. या उपनगरांमध्ये ड्रेनेज, गटारी, पिण्याचे पाणी, घाणीचे साम्राज्य, आरोग्याचा प्रश्‍न अशा समस्यांचा डोंगरच उभा आहे. या समस्या सोडविणे क्रमप्राप्त आहे.