Thu, Apr 25, 2019 22:06होमपेज › Sangli › निमणीत राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद पाडले

निमणीत राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद पाडले

Published On: Apr 19 2018 1:37AM | Last Updated: Apr 18 2018 10:38PMतासगाव : प्रतिनिधी 

गुहागर - विजापूर राष्ट्रीय महामार्गासाठी भूमी अधिग्रहण न करता काम सुरू केल्याचा आरोप करीत निमणी (ता. तासगाव) येथे शेतकर्‍यांनी बुधवारी ते काम बंद पाडले.  संतप्त शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांना घेराओ घालत नुकसानभरपाईची मागणी केली.

गेल्या काही दिवसांपासून तासगाव तालुक्याच्या हद्दीत महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतू, महामार्गासाठी लागणार्‍या जमिनीची अधिग्रहण प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची माहिती किंवा नोटीस देण्यात आलेली नाही. बेकायदेशीरपणे रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे, असे आरोप करीत मोठ्या संख्येने शेतकरी बुधवारी सकाळी रस्त्याच्या कामावर हजर झाले.  शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांना घेराओ घातला. रस्त्यालगतच्या जमिनीची संयुक्‍त मोजणी करावी. राष्ट्रीय महामार्गाची हद्द निश्‍चित करावी. आम्हाला नुकसानभरपाई द्यावी. त्यानंतरच महामार्गाचे काम सुरू करावे, अशी आग्रही मागणी केली. महामार्गाला आमचा विरोध नाही. परंतु अनधिकृतपणे शेतकर्‍यांची जमीन बळकावून महामार्ग करण्याचे शासनाचे मनसुबे असतील तर ते आम्ही उधळून लावू. महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी शेतकर्‍यांचा विरोध दडपण्याचा प्रयत्न केल्यास संघटीतपणे लढा उभारण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला. 

आर. डी. पाटील, जालिदर लिंबळे, मारुती लिंबळे, दीपक गायकवाड, गुंडाजी पाटील, अमर पाटील, संदीप पाटील, बबन लिंबळे, शिवाजी पाटील, राजाराम सूर्यवंशी, पंडित गायकवाड, सचिन पाटील, संपत औताडे, विनायक तोडकर, गणेश धाबुगडे, चंद्रकांत पाटील, मानाजी पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.