Mon, Aug 19, 2019 11:09होमपेज › Sangli › शिराळ्यात नागपंचमी उत्‍साहात (व्हिडिओ)

शिराळ्यात नागपंचमी उत्‍साहात (व्हिडिओ)

Published On: Aug 16 2018 1:07PM | Last Updated: Aug 16 2018 2:07PMशिराळा : विठ्ठल नलवडे 

आंबामातेच्या नावाने चांगभलंच्या गजरात न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत पावसाच्या रिपरिपीमध्ये प्रचंड पोलिस बंदोबस्तात बॅण्ड बेंजो व पारंपरिक वाद्यांच्या गजरात नागराजांची अनेक मंडळांनी मिरवणूक  काढली.

मिरवणूक सुरु असताना पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या. त्यामध्ये नागराज मंडळांनी प्रचंड उत्साहात  नाग  प्रतिमांची मिरवणूक काढली. नागपंचमी उत्सवास न्यायालयाने काही बंधने घातली आहेत, त्यांचे तंतोतंत पालन करीत मिरवणूक काढण्यात आली.

महीला, पुरूष व तरूण वर्गाने यावेळी मोठी गर्दी केली होती. सकाळी गावातील ६० नागराज मंडळांनी आंबामातेचे दर्शन घेतले. घरोघरी मातीच्या नागांची पूजा करण्यात आली. महिलांना जीवंत नागाची पूजा करावयास न मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये कमालीची नाराजी पसरली होती. परंपरे प्रमाणे प्रमोद महाजन व राम महाजन यांच्या घरी नागाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. ही पालखी मिरवणुकीच्या पुढे होती. पालखीचा मान कोतवाल वभूई यांना देण्यात आला. पालखी सोहळ्यात वैजनाथ महाजन,  प्रणव महाजन, अजीत वसुमंत महाजन सहभागी झाले होते. मिरवणूक दुपारी  एक वाजता नायकडपुरा येथून गुरुवार पेठ, कुरणे गल्ली, सोमवार पेठ, आंबामाता रोड या मार्गे काढण्यात आली. गावात आरोग्य पथके व गाड्या ठेवण्यात आल्या होत्या. ग्रामीण रुग्णालयात सर्प दंशावरील पाचशे लसी ठेवण्यात आल्या होत्या. नागपंचमी उत्सवात वन्यजीव अधिनियमाचे व न्यायालयाच्या आदेशाचे पालन होते का नाही हे पहाण्यासाठी महसूल व वन खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

ध्वनीप्रदूषणाची  पहाणी करण्यासाठी ध्वनीमापक यंत्रे तसेच मिरवणूक मार्गावर व्हीडिओ शुटिंग करण्यात आले, तसेच डॉग स्कॉडने मंदिर परिसर व मिरवणूक मार्ग तपासण्यात आला होता. गुंडा विरोधी पथक ठेवण्यात आले होते. 

 एक अप्पर पोलिस अधीक्षक आणि १४ पोलिस निरीक्षक
३३ पोलिस उप निरीक्षक, ३५३ पोलिस कर्मचारी, ६५ महिला पोलिस बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले होते. गावात येणाऱ्या सर्व मार्गवर पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती.  त्यासाठी ५० वाहतूक पोलिसांनीची नेमणूक करण्यात आली होती.  शिराळा नगरपंचायत मार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

आंबामाता मंदिर परिसरात विद्युत खेळणी, मिठाई स्टाईल, खेळण्याची दुकाने आणि फेरीवाल्‍यांनी गर्दी केली होती. या वर्षी नागमंडळाच्या नागप्रतीमांच्या मिरवणुका लवकर संपल्या.

आजच्या दिवशी गावातील दोघांना शेतात काम करत असताना संर्पदंश झाला.  दिपक  राजेंद्र  शिंदे (वय, २२) आणि ऋषीकेश  बजरंग  भोगावकर ( वय, २५) अशी सर्प दंश  झालेल्‍या दोघांची नावे आहेत. या दोघांनाही उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.