Sat, Jul 20, 2019 13:33होमपेज › Sangli › सांगलीत खून, घरफोड्या वाढल्या

सांगलीत खून, घरफोड्या वाढल्या

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 10:05PMसांगली : अभिजित बसुगडे

शहरातील गुन्हेगारी विश्‍वाने नव्या वर्षाची सुरुवातच खुनाने केली. दि. 1 जानेवारी रोजी रमेश कोळी या गुंडाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. त्यावेळपासून सुरू झालेल्या गुन्ह्यांच्या मालिकेने गेल्या तीन महिन्यात शहरातील क्राईम रेट चांगलाच वाढल्याचे दिसून येत आहे. चोर्‍या, घरफोड्या, चेनस्नॅचिंग, मारामार्‍यांनी शहरातील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. अवैध व्यवसायावर चाप लावणार्‍या पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी क्राईम रेट कमी करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा सांगलीकरांकडून व्यक्त केली जात आहे. 

नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच जल्लोष करताना रोखल्याने घरात घुसून कोयत्याने हल्ला करण्यात आला होता.  त्यानंतर दुसर्‍याच दिवशी गुंड रमेश कोळीचा खून करण्यात आला. या घटनांनी गुन्ह्यांची मालिका कायम ठेवली. त्यानंतर जानेवारीमध्ये चोरीच्या घटनांही वाढल्या होत्या. चोरट्यांनी बंद घरे, बंगले, फ्लॅट लक्ष्य केल्याचे दिसून आले. घरफोड्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतानाच दिसून येत आहे. 

चोर्‍या, घरफोडी यासारखे गुन्हे कमी होते म्हणून रात्रीच्यावेळी नागरिकांना लुटण्याचे फंडे गुन्हेगारांनी शोधून काढले. एकाच रात्री सातजणांना लुटण्याचा जणू विक्रमच चोरट्यांनी केल्याचे दिसून आले. चाकूच्या धाकाने लुटणार्‍यांची नावे निष्पन्न झाल्याचेही सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र त्यांना अजूनही अटक करण्यात आलेली नाही. 

हे गुन्हे वाढलेले असतानाच अधून-मधून चेनस्नॅचिंगचे प्रमाणही वाढले आहे. शिवाय रागाने पाहिल्याने, पूर्ववैमनस्यातून मारामार्‍याही ठरलेल्या आहेत. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात घातक शस्त्रे घेऊन फिरणार्‍या, दरोड्याच्या तयारीत असणार्‍या सुमारे डझनभर संशयितांना पोलिसांनी अटक केली. मात्र तरीही शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण आटोक्यात आलेले नाही. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील क्राईम रेट कमी करण्याचे आव्हानच गुन्हेगारांनी पोलिसांसमोर उभे केले आहे. 

Tags : sangli, sangli news, murdered, burglary, increased,