Mon, Jul 22, 2019 13:15होमपेज › Sangli › महिलेचा खून : संशयितांना पोलिस कोठडी 

महिलेचा खून : संशयितांना पोलिस कोठडी 

Published On: Jan 19 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 11:41PMकुपवाड : वार्ताहर

शहरातील श्रीमती इंदुबाई शिवाजी माने (वय 52, रा.उल्हासनगर) या महिलेच्या खून प्रकरणी संशयित संतोष लहू गवस (वय 19, सध्या रा.कुपवाड, मूळ गाव फणसवाडी, ता.दोडामार्ग, जि.सिंधुदुर्ग) व त्याचा साथीदार उमेश आप्पाण्णा कुल्लोळी (वय 19, रा. नागराज कॉलनी, सांगली) या दोघांना आज सात दिवसांची  पोलिस कोठडी देण्यात आली. 

संशयित  गवस हा मृत इंदुबाई माने हिच्या खोलीजवळच्या एका  खोलीत भाड्याने राहत होता. तो व त्याचा मित्र उमेश कुल्लोळी दोघेही सेंट्रिगचे काम करीत होते. शेजारी रहात असल्याने गवस याची त्या महिलेशी व तिच्या मुलीबरोबर ओळख झाली होती. या ओळखीतून गवसचे व त्या मुलीचे प्रेमसंबंध जुळले होते.  या दोघांच्या प्रेमात त्या महिलेचा अडसर येत होता. 

त्यामुळे गवसने या महिलेचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले. त्यानुसार त्याने मित्र कुल्लोळी याला शुक्रवारी (दि.6) आपल्या खोलीत बोलावून घेतले. दोघांनी तिचा गेम करण्याचा बेत आखला.  गवस हा त्या महिलेच्या खोलीत गेला. ‘मावशी जरा पोते धरायला माझ्या खोलीत या’, म्हणून तिला खोलीत बोलावून घेतले. ती खोलीत आल्यावर कुल्लोळी याने तिचे तोंड दाबून धरले तर गवसने चामडी पट्ट्याने तिचा गळा आवळला. यावेळी तिघांच्या झटापटीत इंदुबाई माने हिच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यातच तिचा मृत्यू झाला. त्या दोघांनी तिचा मृतदेह एका पोत्यात बांधून खोलीत ठेवला. शुक्रवारी रात्रभर आई घरी आली नसल्याने त्या मुलीने शनिवारी नातेवाइकांकडे चौकशी केली. त्यावेळी संशयित गवस हा सुध्दा तिच्या बरोबर शोधशोध करायला मदत करीत होता. त्याचवेळी त्या मुलीने तिची आई बेपत्ता झाल्याची कुपवाड पोलिसात  फिर्याद दिली होती. संशयित गवस याने  मृतदेह तीन दिवस त्याच्या खोलीत ठेवला होता.  उग्र वास येऊ लागल्याने  मृतदेह  असलेले पोते मित्र कुल्लोळी याच्या मदतीने एकाद्या विहिरीत टाकायचे, असे त्यांनी ठरवले. अंधाराचा फायदा घेऊन ते पोते दोघेजण डोक्यावर घेऊन जात होते. त्यावेळी  कुत्री भुंकू लागली. त्यामुळे  लोक जागे होतील, या भीतीने दोघांनी ते पोते पत्र्याच्या शेडमध्ये टाकून फरार झाले होते. 

या महिलेच्या मुलीने संशयित गवस यानेच तिच्या आईचा खून केल्याची फिर्याद कुपवाड पोलिसात दिली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी संशयितांचा शोध घेऊन उरमोडी (जि.सातारा ) धरणाजवळ त्यांना ताब्यात घेतले.